
दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । पंढरपूर । आषाढी वारीसाठी विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातूनही लाखो भाविक पंढरपुरात येतात. पायी चालताना वारकऱ्याचा पाय खड्ड्यात पडून काही दुर्घटना होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा देण्याबरोबरच शहरातील नगर प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार घाट ते घाट चौक, नामदेव पायरी यासह शहरातील रस्त्यावर असणारे खड्डे, पॅचेस बुजविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाबाबत संबंधित विभागाच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत यंदा मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्याने नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात खड्ड्यामुळे दुर्घटना होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. प्राधान्याने सर्व कामे करावीत. संबंधित प्रत्येक विभागांनी छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावे.
उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात बुस्टर डोस
कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. जिल्ह्यामध्ये रोज दोन-तीन रूग्ण सापडत आहेत. यामुळे वारी कालावधीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, वारकरी यांना बुस्टर डोस सक्तीचा केला आहे. उद्यापासून (दि.23 जून) सोलापूर शहरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात सोय करण्यात आल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली. उर्वरित अधिकारी, कर्मचारी यांचे नियोजन विभागप्रमुखांनी तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर करावे, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणीसुद्धा आरोग्य केंद्र चालू ठेवावीत. त्याच ठिकाणी वारकऱ्यांच्या कोरोना तपासणी करण्याची सोय करावी. वारी मार्गावरील प्रत्येक तालुक्यात एक विलगीकरण केंद्र तयार ठेवावे. शिवाय वारकऱ्यांच्या लसीकरणासाठीही व्यवस्था करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.
पालखी मुक्काम ठिकाणे, विसावा ठिकाणावर मुरमीकरणाचे काम त्वरित करून घ्यावे. पाणीपुरवठ्यासाठी स्त्रोत निश्चित केले आहेत. महावितरणने त्याठिकाणी वारी कालावधीपुरते डीपी बसवून द्यावेत. ग्रामीण भागासाठी सहा तर नगरपरिषद हद्दीमध्ये 15 टॅंकरची सोय करण्यात आली असून 63 पाण्याचे स्त्रोत राखून ठेवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तसेच 65 एकर, पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी मुबलक प्रमाणात तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करावी. शौचालय वेळच्या वेळी स्वच्छतेसाठी यंत्रणा उभी करावी, वेळोवेळी पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी वारी कालावधीमध्ये कोणतीही उणीव राहू नये, यासाठी कामांचे विकेंद्रीकरण केले आहे. यासाठी मानाच्या पालख्यांना संपर्क अधिकारी दिले आहेत. पंढरपूर शहरात 49 ठिकाणी तात्पुरती शौचालये उभारण्यात आली आहेत. शौचालयाबरोबर स्वच्छतेवरही भर दिला आहे.
40 टक्के शौचालये महिलांसाठी राखीव
पालखी मार्गावरील 70 गावात स्वच्छता, आरोग्य, पाणी याबाबत दक्षता घेण्यात येणार आहेत. तात्पुरत्या शौचालयांसाठी जागा निश्चिती करण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या उपचारासाठी 105 उपचार केंद्रासह 35 बाईक ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे. 40 टक्के शौलाचये महिलांसाठी राखीव राहणार असून महिलांच्या मदतीसाठी महिला अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आल्याची माहिती श्री. स्वामी यांनी दिली.
श्रीमती सातपुते यांनी वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. पंढरपूर शहरात असणारे खड्डे वारीत अडथळा आणू शकतात, ते बुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभाग वारी कालावधीसाठी सुमारे तीन टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. श्री. शंभरकर यांनी पालखी मार्गावरील गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशीही संवाद साधून कामाची माहिती घेतली.