
दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. गट, गणांच्या कच्च्या प्रभाग रचनेचर हरकती, आक्षेपांवर सुनावणी होऊन ३३ ठिकाणी अंशत: बदल करुन पुन्हा अंतिम प्रभाग रचना तयार करण्यात आली. ही अंतिम प्रभाग रचना सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार जिल्’ात ७३ गट व १४६ गण असणार आहेत. आता या गट, गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. लोकसंख्यानिहाय आरक्षणानंतरच राजकीय गणिते स्पष्ठ होणार आहेत
सातारा जिल्हा परिषद गट आणि गण पंचायत समिती गण यामध्ये नव्या रचनेत काही ठिकाणी गट आणि गण वाढले आहेत. यामध्ये पूर्वीचे ६४ गट होते ते नव्या रचनेत ७३ गट झाले तर १२८ गण ते होते त्यामध्ये बदल होवून १४६ गण झाले आहेत. या गट, गण रचनेनंतर प्रभाग रचनेवर एकूण १00 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुनावणी होवून प्रारुप रचना पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर केल्या. त्यामध्ये १00 पैकी ६७ हरकती फेटाळल्या. उर्वरीत ३३ हरकतीमध्ये अंशत: बदल करुन झेडपीची प्रभाग रचना जाहीर केली असली तरी आता ओबीशीशिवाय आरक्षणाचे वेध राहणार आहेत. त्यानंतरच राजकीय गणिते स्पष्ट होणार आहेत.
लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषदेमध्ये आता नव्याने ९ गटांची वाढ झाल्याने ७३ गट तर पंचायत समितीमध्ये नव्याने १८ गण वाढल्याने १४६ गण निर्माण झाले. या नव्या रचनेत अनेक विद्यमान सदस्यांचे गट व गणांचे अस्तित्व संपले आहे. तर काही ठिकाणी नव्याने गटाची आणि गणाची निर्मिती झाली आहे. आज प्रभाग आरक्षण झाले असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण काढण्यात येणार असल्यामुळे याबाबत उत्सुकता आहेच.
आगामी आठवड्यात आरक्षण सोडत गट, गणनिहाय काढली जाईल. यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात गट, गण आरक्षित ठेवले जातील. पहिल्यांदा एससी, एसटीचे आरक्षण काढले जाईल, त्यानंतर भटक्या विमुक्त जातीचे आरक्षण निघेल. त्यानंतर सर्व प्रभागातील महिलांसाठीचे आरक्षण काढले जाईल. यावेळेस ओबीसी आरक्षणाविना निवडणूका होत असल्याने सर्वाधिक मतदारसंघ हे खुले व खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच राखीव राहण्याची शक्यता आहे. पण, ओबीसी आरक्षण नसले तरी स्थानिक पातळीवरील पक्ष व आघाड्या काही जागांवर ओबीसी उमेदवारांनाही संधी देण्यात येऊ शकणार आहे.