स्थैर्य, वाई, दि.०७: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सोमनाथ शिवाजी भारती (वय 27, रा.बावधन ता.वाई) याच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, महिलेवर पाचगणीसह आणखी हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिला 30 वर्षीय आहे. तक्रारदार व संशयित आरोपी सोमनाथ भारती या दोघांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर काही दिवसांनी संशयिताने असलेल्या संबंधाचे फोटो महिलेला दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्या फोटोच्या आधारे संशयिताने पाचगणीसह आणखी काही हॉटेलमध्ये नेवून बलात्कार केला. ही सर्व घटना ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2021 या कालावधीमध्ये घडली आहे. संशयिताने महिलेला फोटो व्हायरल करण्याची व ते फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी दिली.
संशयिताने ब्लॅकमेल करत महिलेच्या एटीएमवरुन 4800 रुपये व गुगल पे वरुन 15,500 रुपये घेतले असून त्या बदल्यात फोटो डिलीट करण्यासाठी घेतले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संशयित आरोपी वारंवार धमकी देत असल्याने अखेर महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुध्द बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.