राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर वाद्याच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
स्थैर्य, बारामती, दि. २५ : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीकेचा वर्षाव होत आहे. आता याच वक्तव्याप्रकरणी पडळकर यांच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी (24 जून) बारामती शहर पोलिसांना गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले होते. गुरूवारी (25 जून) पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनेपोलिसात तक्रार नोंदवली असून पडळकर यांच्याविरोधात कलम 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता
त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तोंड सांभाळून बोलावं अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
पवारांसंदर्भातील वक्तव्य चुकीचं-देवेंद्र फडणवीस
गोपीचंज पडळकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच नाही, तर भाजपकडूनही टीका झाली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबद्दलचं गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
“शरद पवार साहेब हे राजकीय विरोधक आहेत, मात्र शत्रू नाहीत. ज्येष्ठ नेत्यांबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. पडळकर यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केलं असून त्यांनी याबद्दल माफी मागितली आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.
“सर्वच पक्षातील लोकांनी बोलताना संयम बाळगायला हवा. ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना भान बाळगले पाहिजे,” असं आवाहनही फडणवीस यांनी केलं.