दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । सातारा । दीपाली सय्यद यांनी भारताच्या पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले, त्याबद्दल दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील यांनी सातारा शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हणले आहे की, दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोह आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा, दीपाली सय्यद यांची मुलाखत एका व्हिडीओ क्लिप द्वारे प्रसारित झाली आहे, त्यात त्या म्हणतात, की सोमय्या यांच्या जागी मोदी जरी असते तरी त्यांच्यावर हल्ला झाला असता.
या वरून हे लक्षात येते की हा हल्ला पूर्व नियोजित आहे आणि काहीही झाले तरी हल्ला करायचाच या उद्देशाने त्या ठिकाणी जमाव गोळा केला गेला होता. दीपाली सय्यद यांना अटक करून त्यांच्याकडून आणखी भरपूर माहिती मिळू शकेल. पंतप्रधान मोदीजी जरी गाडीत असते तरी त्यांच्यावर हल्ला झाला असता या दीपाली सय्यद यांच्या वक्तव्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा, शत्रूराष्ट्राचा हात आहे का हे सुद्धा तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
ताबडतोब दिपाली सय्यद यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील, सातारा शहराध्यक्षा रीना भणगे, युवती मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा पायल टंकसाळे, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हाध्यक्षा अश्विनी हुबळीकर, ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्षा वनिता पवार, श्वेता पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.