दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । मुंबई । पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.तालुक्यातील कोळगावात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय तरुणांची अमानवीय हेटाळणी करीत त्यांची धिंड काढण्यात आली.या प्रकरणाची सखोल तपासणी करीत दोषींविरोधात तसेच स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी केली. यासंबंधी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.दोषीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात आली नाही तर बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा आक्रमक इशारा देखील अँड.ताजने यांनी दिला आहे.
अहमदनगर जिल्हा दलितांवर घडणाऱ्या अत्याचाराची राजधानी झाली आहे. यापूर्वी झालेले सोनई आणि कोपर्डी हत्याकांडाने संपूर्ण राज्य तसेच देश हादरले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे सरकार असो, भाजप-शिवसेनेचे सरकार असो, महाविकास आघाडीचे सरकार असो अथवा आता शिंदे-फडणवीस सरकार असो दलितांवरील अत्याचारात कुठलीही घट झालेली नाही. सर्वच सरकारच्या काळात दलितांचे शोषण होतच राहीले, असा दावा त्यांनी यानिमित्ताने केला. चर्मकार, मातंग आणि नाभिक समाजाच्या चार तरुणांचे मुंडन करून गावातून ४ तास धिंड काढण्यात आली. मानवतेला काळीमा फासणारी आणि फुले-शाहु-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचे नाव बदनाम करणारी ही घटना आहे.महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना घडणे निंदनीय आहे.भाजप सत्तेवर येताच राज्यात बहुजनांवर अशाप्रकारचे अत्याचार सुरू झाल्याचे दिसून आल्याने हे कुठल्या विचारांचे सरकार आहे, याची प्रचिती येत असल्याचे अँड.ताजने म्हणाले.
या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.इतर गरीब समाजातील कुटुंबांना त्याची सामाजिक, धार्मिक जरब बसावी, त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हावे, समाजात धार्मिक तेढ निर्माण व्हावा असा उद्देश या घटनेमागे असल्याचे दिसून येत आहे.फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात वेगळ्या वाटेवरच्या या पाऊलखुणा समाज माध्यमांवर पडत असल्याचे षडयंत्र असामाजिक तत्वांकडून निर्माण केले जाते आहे, असे अँड.ताजने म्हणाले. दरम्यान सदर घटनेचा व्हिडीओ जगभरात समाज माध्यमांवर व्हायरल केला गेला असून भारताच्या एकता-अखंडता,सामाजिक सौहार्दाचे त्यामुळे धिंडवडे निघत आहेत. अशात या प्रकरणातील जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात दखल घेत कडक कारवाई करावी, अशी विनंती बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
आजही मागासवर्गीयांचे जगण्याचे अधिकार हिणावला जात आहे.त्यांना संशयित दृष्टीतून बघितले जाते.नव्या मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्त्वाच्या अजेंड्यात हिंदु मागासवर्गीयांच्या धिंडी निघत राहणार आहेत का? त्यांच्या संरक्षणाचे काय? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. ऐरवी फोनवर चर्चा करुन तात्काळ निर्णय घेत कारवाईचे आदेश देणारे मुख्यमंत्री या घटनेतील दोषींना अटकेचे आदेश देणार का? असा सवाल देखील अँड.संदीप ताजने यांनी उपस्थित केला.