
दैनिक स्थैर्य | दि. २३ मार्च २०२२ | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माझी प्रचंड मोठी अशी आर्थिक फसवणूक केलेली आहे. स्वराज कारखाना व स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या संचालक मंडळांनी वेळोवेळी खोटी बिले व पावती बनवून आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्यांच्या विरोधात तालुक्यातील विविध नागरिकांनी माझ्याकडे सक्षम असे पुरावे आणून दिलेले आहेत. माझ्यासोबत तालुक्यातील अनेकांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे. तरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह कारखाना व पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिगंबर आगवणे यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे केलेली आहे.

दिगंबर आगवणे यांनी नाना पाटील चौक येथून भीक मांगो आंदोलनाला सुरवात केली. परंतु पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी त्यांना भीक मांगो आंदोलन करण्यापासून मज्जाव केला. नाना पाटील चौकाच्या येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आयडीबीआय बँक परिसर त्यांनंतर महात्मा फुले चौकाच्या मार्गे प्रांताधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करत अधिकार गृहाच्या बाहेर दिगंबर आगवणे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

आज केलेल्या भीक मांगो आंदोलनामध्ये जी काही भीक जमा होईल ती भीक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठवणार आहे. जो पर्यंत मला न्याय मिळत नाही व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्वराज कारखाना व पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. माझ्यासह तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फसवलेले आहे. त्यातील काही जणांनी माझ्याकडे पुरावे सादर केलेले आहे. त्यावरही आपण आवाज उठवणार आहोत, अशी माहिती या वेळी दिगंबर आगवणे यांनी दिली.

भीक मांगो आंदोलन करीत उपोषणाला जात असताना आयडीबीआय बँकेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून मिळवलेले कर्जाची कागतपत्रे तातडीने देण्यात यावीत अशी मागणी आयडीबीआय बँकेच्या फलटण शाखा व्यवस्थापक यांच्याकडे त्यामध्ये तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती बँक तुम्हाला देईल परंतु इतर खात्यांच्या माहिती जर प्रशासनाने मागितली तरच आम्ही देवू शकतो असे आयडीबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांनी यावेळी आगवणे यांना सांगितले.