स्थैर्य, पाटण, दि. २६ : शेडगेवाडी येथे जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन गटात लोखंडी सळई व लाकडी दांडक्याने तुंबळ हाणामारी झाली. यात सरपंचाला मारहाण करण्यात आली असून मल्हारपेठ पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत मल्हारपेठ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवार, दि.22 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शेडगेवाडी, ता. पाटण येथील फिर्यादी संतोष शेडगे (वय-37) व त्याचा भाऊ सुहास शेडगे हा गावातील दूध डेअरी जवळ बसले असता जुन्या भांडणाचा राग मनात धरून सुनील अशोक शेडगे याने अचानक मागने येऊन काही एक न बोलता त्यांच्या हातातील लोखंडी सळईने संतोष शेगडे यांच्या उजव्या बाजूच्या डोक्यात मारुन जखमी केले तर त्यांचा भाऊ सागर अशोक शेडगे याने येऊन मला व माझ्या भावास दमदाटी, शिवीगाळ केली. यात डोक्याला मार लागल्याने त्यांना मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे.
सुनील अशोक शेडगे (वय-27) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार, दि. 22 जुलै रोजी 7 च्या सुमारास मोटर सायकलमधील पेट्रोल संपल्याने उपसंरपच नितीन यादव यांना घेऊन त्यांच्या गाडीवरून पेट्रोल आणण्यासाठी जात असताना दुधाच्या डेअरी जवळ सरपंच संतोष शेडगे यांनी उपसरपंच यांना थांबवून गाडी थांबवली व मला पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सरपंच शेडगे यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने पाठीवर पायावर मारहाण केली. तसेच त्यांचा भाऊ सुहास कृष्णत शेडगे याने त्याच्या हातातील लोखंडी सळईने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. धनराज पवार, सुरज शेडगे यांनीही लाकडी दांडक्याने मारहाण करून दमदाटी शिवीगाळ केली तसेच डोक्याला गंभीर मारला लागल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत.
दरम्यान, या मारहाण प्रकरणी मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत.