जिंकण्यासाठीच साठीच लढतोय : जयंत लंगडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


  

स्थैर्य, सातारा, दि ६: पदवीधर मतदारसंघ म्हणजे राजकीय पुनर्वसनाची सोय हे आजवरचे राजकीय समीकरण होते, मात्र पदवीधरांचा ‘असली चेहरा’ म्हणून मी निवडणुकीला सामोरे जातोय. आजवरच्या पदवीधर आमदारांनी या मतदारसंघातील मतदारांसाठी काहीही केले नाही, मात्र सर्वसामान्य मतदारांच्या व पदवीधरांच्या व्यथा- वेदना आणि प्रश्न संपविण्यासाठी सर्वसामान्य मतदारांपैकीच एक असणारा मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. माझी उमेदवारी जिंकण्यासाठीच असून येत्या मंगळवारी, दि. 10 नोव्हेंबरला मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार जयंत लंगडे यांनी दिली आहे.पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक 1 डिसेंबरला होत असून त्यामध्ये वडूज (ता. खटाव) येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जयंत लंगडे हे उमेदवारी दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धिमाध्यमांशीकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी ही माहिती दिली. पदवीधरांतून निवडून जाणाऱ्या आजवरच्या प्रतिनिधींनी केवळ विधिमंडळात जाण्यापुरताच या मतदारसंघाचा वापर केला, मात्र पदवीधरांना नोकरी व्यवसाय व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आजवरच्या पदवीधर आमदारांनी काहीच केले नाही. मतदारांचे आभार मानण्यासाठीही पदवीधरांचे आमदार कधीच मतदारसंघात फिरकले नाहीत. एवढेच नव्हे तर पदवीधरांचे नेमके काय प्रश्न आहेत हेसुद्धा त्यांनी समजून घेतले नाही, इतकेच काय पण पोलिंग एजंट यांनाही त्यांनी वार्‍यावर सोडले, अशी टीकाही श्री. लंगडे यांनी केली. साताऱ्यासह सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या पाचही जिल्ह्यात लक्षणीय मतदार नोंदणी करून जयंत लंगडे यांनी विजयाच्या दिशेने पावले उचलली आहेत. 

पत्रकार म्हणून ग्रामीण भागातून सुरुवात करणाऱ्या जयंत लंगडे यांनी सकाळ, लोकमत, तरुण भारत, मुक्तागिरी, ग्रामोध्दार, लोकमंथन आदी दैनिकांमध्ये संपादकीय विभागात जबाबदारीची पदे सांभाळली आहेत, तसेच पुण्यनगरी या वृत्तपत्राचे जिल्हा संपादक तथा आवृत्तीप्रमुख म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सध्या ‘लोकसाम्राज्य न्यूज’ या चॅनेलची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी डिजिटल पत्रकारितेचे नवे पर्व सुरू केले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या न्यूज चॅनेलने समाजसेवेचा वसा व वारसा जपला आहे या माध्यमातून जयंत लंगडे यांनी मोठा आणि व्यापक जनसंपर्क निर्माण केला आहे. वडूज नगरपंचायत, दहिवडी महाविद्यालयाची विद्यार्थीसंसद, विद्यापीठ प्रतिनिधी आधी निवडणुकांचा जयंत लंगडे यांना यशस्वी अनुभव असून लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील अनेक यशस्वी उमेदवारांची भाषणे व प्रचार यंत्रणेसह व्हुह रचनेमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. गतवेळच्या पदवीधर निवडणुकीत उल्लेखनीय मते मिळवलेल्या एका उमेदवाराच्या प्रचार यंत्रणेची धुराही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. या अनुभवाच्या बळावरच यंदाच्या पदवीधर निवडणुकीचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले आहे.

लोकसाम्राज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य धडपड युवा मंच, दौलत सामाजिक विकास संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संत नामदेव शिंपी समाज संघटना, खटाव तालुका पत्रकार विकास संस्था, पदवीधर सेवा संघ, ग्रामीण पत्रकार संघ, व्याख्याते व लेखक संघटना आदींच्या माध्यमातून जयंत लंगडे यांनी समाजसेवेचा नंदादीप अविरत तेवत ठेवला आहे. 

इंग्रजीचे पदवीत्तर शिक्षण व पत्रकारितेतील उच्च पदवी प्राप्त केलेले जयंत लंगडे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रपाठक म्हणूनही कार्यरत आहेत. तेथील पदवीधर विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यावर तसेच पाचही जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाठबळावर ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!