दहशतवादाशी लढणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता – सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० ऑक्टोबर २०२२ । मुंबई । दहशतवादी कृत्ये  हे वाईटच आहेत. दहशतवादाशी लढा देणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन  संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस यांनी केले. त्यांनी आज हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना  श्रद्धांजली वाहिली. या निमित्ताने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव,  राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. गुटेरेस म्हणाले, दहशतवादाविरोधात लढा देणे ही जागतिक जबाबदारी आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार स्वीकारताच दहशतवादाशी लढा देण्यासाठी उपाय सुचविणारे कक्ष तयार केले. यात अनेक राष्ट्रांच्या समन्वयाने कार्य चालते आहे. दहशतवादाशी लढा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले जाते. इथे दहशतवादाच्या मूळ कारणावर अभ्यास करण्यात येतो.

26/11 च्या देशावर झालेले हल्ल्यात शहीद झालेले लोक हे खरे हिरो आहेत. हा अत्यंत रानटी हल्ला होता. बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांसह  यात 166 लोकांनी प्राण गमावले आहेत. या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करुन  भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या सहकार्याविषयी श्री. गुटेरेस यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

चित्र प्रदर्शनाला भेट

26/11 च्या हल्ल्याच्या वेळी विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचे तसेच या हल्ल्याचे गांभीर्य दर्शविणाऱ्या तैलचित्रांचे छोटे प्रदर्शन इथे लावण्यात आले होते. प्रत्येक छायाचित्राबाबत श्री. गुटेरेस यांनी माहिती घेतली. त्यानंतर मुंबई वरील हल्ल्यात तेव्हा  जखमी झालेल्या कुमारी देविका रोटावन हिची आस्थेने विचारपूस केली. कुमारी देविका रोटावन ही तेव्हा केवळ दहा वर्षांची होती. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तिच्या पायात गोळी लागली होती.


Back to top button
Don`t copy text!