
स्थैर्य, सातारा, दि. १३: सातारा जिल्हा जंबो कोविडं रुग्णालयाच्या बाहेर कौटूंबिक वादातून लाकडी दांडके आणि लोखंडी गजाने जोरदार भांडणे आणि मारामारी झाली.यामुळे परिसरात असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले .या मारामारीत एक महिला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाली आहे.
सातारा कोविड सेंटरच्या आवारात मोटारीने येऊन हातात लाठ्या व लोखंडी गज घेऊन काही जण गाडीतून उतरले.त्यांनी या परिसरात उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांसमोर कोणाची तरी शोधाशोध सुरु केली.हा प्रकार पाहून कोविडं रुग्णांचे नातेवाईकांमध्ये एकदम भीतीचे वातावरण झाले. यावेळी रुग्णालयाच्या दरवाज्यात गर्दीत लपून बसलेल्या दोघांना त्यांनी शोधून काढले. लाठ्या व लोखंडी गजाने जोरदार मारहाण केली आणि आलेल्या गाडीने लगेच निघून गेले.यावेळी भांडणे सोडवायला गेलेल्या महिला पोलीस जखमी झाल्या. फिल्मी स्टाईल कोविडं रुग्णालयाच्या दरवाजासमोर झालेल्या या प्रकाराने परिसरातील सगळेच आश्चर्यचकित व भयभीत झाले.यापरिसरात झालेल्या प्रकारची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले.मारहाण झालेल्या अधिक बैजू व एकनाथ बैजू काळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.यामध्ये दोन जण जखमी झाले त्यात एक जण गंभीर आहे. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते.कौटूंबिक वादातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.
करोनावर उपचार रुग्णालयाच्या आवारातच रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. याच परिसरात भांडणे व मारामारी झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.यामुळे कोविडं रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. या ठिकाणी रुग्णालयातील चारशे रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या आजूबाजूला बसून असतात. त्यामुळे या परिसरात कोणालाही अनावश्यक प्रवेश देऊ नये. दरवाजातून आत येणाऱ्या प्रत्येकाची नोंद करावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी आज केली.अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.