
दोन्ही गटातील 13 जणांवर गुन्हा : एक जखमी
स्थैर्य, सातारा, दि. 9 : शिवथर, ता. सातारा येथे दोन गटात मस्करी केल्याच्या कारणावरून व चुलत्यास दमदाटी केल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटातील 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत गुडघ्याला दगड लागून एकजण जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी, शिवथर, ता. सातारा येथे फिर्यादी गणेश मच्छिंद्रनाथ साबळे व त्यांचे भाऊ अजित प्रताप कदम हे घराच्या दारात बसले होते. यावेळी शशिकांत उर्फ गोट्या भंडलकर, रामभाऊ यांचा मुलगा (नाव माहीत नाही), राहूल मच्छिंद्र बोडरे, बाळू बोडरे, अमर बाळू खोमणे यांनी फिर्यादीच्या चुलत्यास वस्तीतून हाकलून दिल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून मारहाण केली. शशिकांत भंडलकर याने गणेश साबळे यांच्या डोक्यात दगड मारला. गणेश साबळे यांनी तो दगड चुकवल्याने अजित कदम यांच्या गुडघ्याला लागून ते जखमी झाले. या फिर्यादीवरून वरील संशयीतांवर गुन्हा दाखल झाला असून हवालदार कदम तपास करत आहेत.
तर शशिकांत तानाजी भंडलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मस्करी केल्याचा समजातून अजित प्रताप कदम, अनिल गणेश साबळे, राजेंद्र प्रताप कदम, मोहन रामचंद्र साबळे, विजय प्रताप कदम, तन्मय राजेंद्र कदम, राज विजय कदम आणि गणेश मच्छिंद्र साबळे सर्व रा. शिवथर यांनी फिर्यादी शशिकांत भंडलकर, त्यांचा मित्र राहूल मच्छिंद्र बोडरे आणि तुषार रामचंद्र साबळे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीवरून वरील संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.