वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०३ : शाहूनगर, गोडोली येथील अमराई रेसिडेन्सीसमोरील जागेत जेसीबीने खोदकाम करताना वहिवाटीवरून वाद होवून दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील दहाजणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फिर्यादी गौरी बाळासाहेब जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी दि. 28 रोजी शाहूनगर, गोडोली येथे जमिनीची लेव्हल व साफसफाई करण्यासाठी जेसीबी बोलावला होता. जेसीबी तेथे आल्यानंतर अनिल महादेव जाधव, प्रकाश एकनाथ बोधे, उषा भिमराव निकम, संगीता अनिल जाधव, वनिता दत्तात्रय इंगळे सर्व रा. अमराई रेसीडेन्सी, शाहूनगर, गोडोली त्याठिकाणी आले. त्यासर्वांनी फिर्यादीचे भाऊ गणेश जगताप यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व गटरावर ढकलून दिले. गौरी जगताप भावाला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही सर्व संशयितांनी केस ओढून धक्काबुक्की केली तसेच दगडांनी मारहाण केली. त्याचप्रमाणे जेसीबीवरही दगडफेक करून चालकाला शिवीगाळ व दमदाटी करून हाकलून दिले. या फिर्यादीनुसार अनिल महादेव जाधव, प्रकाश एकनाथ बोधे, उषा भिमराव निकम, संगीता अनिल जाधव, वनिता दत्तात्रय इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रोकडे करत आहेत.
तसेच फिर्यादी संगीता अनिल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेसीबी चालक, गणेश बाळासाहेब जगताप, गौरी बाळासाहेब जगताप, कमल बाळासाहेब जगताप तसेच गणेश जगताप याची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) हे सर्वजण जेसीबी आणून अपार्टमेंटच्या समोर मुख्य वहिवाट असलेला रस्ता अडवून खोदण्यास सुरुवात करणार असल्याने फिर्यादीचे पती अनिल जाधव, बिल्डिंगमधील दीपक माने, राजेंद्र फाळके, सूर्यकांत कर्णे, साळुंवे व इतर चारजण तेथे गेले. त्या सर्वांनी जेसीबी चालकाला ही न्यायप्रविष्ट बाब असून रस्ता खोदू नको, अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल होवू शकतो, असे सांगितले. याचा राग येवून जेसीबी चालकाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. खोदकाम करणारच असे सांगत जेसीबी चालक वीट घेवून त्यांच्या अंगावर धावून गेला. ही भांडणे सोडवण्यास फिर्यादी गेल्या असता चौघा संशयितांनी त्यांना ढकलून दिल्याने मुका मार लागला आहे. तसेच तेथे उपस्थित असलेल्या इतर महिलांच्याही अंगावर धावून जात त्यांनाही संशयितांनी दगडे मारण्यास सुरुवात केली. या फिर्यादीनुसार जेसीबी चालक, गणेश बाळासाहेब जगताप, गौरी बाळासाहेब जगताप, कमल बाळासाहेब जगताप तसेच गणेश जगताप याची पत्नी आदींवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रोकडे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!