कोरोना काळात रुग्णालयांकडून होणार्‍या फसवणुकीच्या विरोधात संघटितपणे लढा द्या ! – आरोग्य साहाय्य समिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १०: कोरोनामुळे रुग्णाची गंभीर स्थिती असतांना तो रूग्ण वाचावा, म्हणून आपण कोणतीही पर्वा न करता त्या रूग्णाला रुग्णालयात दाखल करतो; मात्र आपल्याला शासनाने निर्धारित केलेले रुग्णसेवेचे दर, आवश्यक औषधे, पर्यायी औषधे, आपले अधिकार, सध्याचे कायदे हे ज्ञात नसल्यामुळे आपली प्रचंड लुटमार चालू होते. या अडचणीच्या वेळी अनेक जण खचून जाऊन लढण्याचा विचार सोडून देतात. त्यामुळे लुटमार करणार्‍यांचे फावते. अशा वेळी आपण उपलब्ध कायदे आणि औषधोपचाराविषयी योग्य माहिती घेतल्यास आपली फसवणूक टळू शकते. यासाठी कोरोना काळात होणार्‍या फसवणुकीच्या विरोधात संघटितपणे लढा दिला पाहिजे. आपण जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस यांच्याकडे तक्रार करून दोषींवर कारवाईसाठी प्रयत्न करू शकतो, असे प्रतिपादन आरोग्य साहाय्य समितीचे मुंबई जिल्हा समन्यवक डॉ. उदय धुरी यांनी सांगितले. ते ‘आरोग्य साहाय्य समिती’ आयोजित ‘कोरोना काळात फसवणुकीचे बळी : आपले अधिकार ओळखा !’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते. या वेळी पुणे येथील ‘श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पीटल’च्या भूलशास्त्र तज्ञ डॉ. ज्योती काळे या देखील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीच्या Hindujagruti.org या संकेतस्थळावरून, तसेच, ‘ट्वीटर’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात आला. हा कार्यक्रम 6632 लोकांनी पाहिला.
या परिसंवादात प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. ‘समाजव्यवस्था उत्तम ठेवणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे; मात्र प्रशासन आणि समाजव्यवस्था भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याला त्याच्याविरोधात आवाज उठवावा लागेल’, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले. या वेळी देशभरातील विविध राज्यांतील काही रुग्ण तथा रुग्णांचे नातेवाईक यांनी त्यांची कशी लुटमार करण्यात आली, याचे अनुभव कथन केले. तसेच काही रुग्णांना वेळेत उपचार न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. याविषयी बोलतांना डॉ. धुरी पुढे म्हणाले की, खाजगी रुग्णालयांमध्ये प्रचंड लुटमार चालू आहे. अशी लुटमार करणार्‍या ठाणे जिल्ह्यातील ‘ठाणे हेल्थकेअर’ आणि ‘सफायर’ या दोन रुग्णालयांच्या विरोधात ‘आरोग्य साहाय्य समिती’ने ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. या दोन रुग्णालयांकडून 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे; मात्र अशा रुग्णालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना रुग्णांचे पैसे परत करण्यास भाग पाडले पाहिजे, तर जनतेला खरा न्याय मिळेल. यासाठी आपण ‘ग्राहक मंचा’कडे तक्रार करायला हवी.
‘रेमडीसिव्हिर’ इंजेक्शनविषयी बोलतांना डॉ. ज्योती काळे म्हणाल्या की, ‘रेमडीसिव्हिर’ इंजेक्शनला जीवनरक्षक म्हणून मान्यता नाही. गंभीर रुग्ण नसलेल्यांना प्रारंभीच्या काळात या इंजेक्शनचा लाभ होतो; पण या इंजेक्शनला फॅबी-फ्लू, फॅवीपीरॅवीर, स्टेरॉईड, प्रतिजैविके (अ‍ॅन्टी-बायोटिक), ऑक्सिजन आदी अनेक पर्याय आहेत. या सर्व पर्यायी औषधांनी रुग्ण बरे होतात. हे प्रशासन आणि वैद्यकीय संघटना यांनी जनतेला सांगितले पाहिजे. या वेळी लोकांनी आपले अनुभव ‘आरोग्य साहाय्य समिती’ला कळवावे, असे आवाहनही करण्यात आले.
आपला विश्‍वासू,
डॉ. उदय धुरी,
आरोग्य साहाय्य समिती,

Back to top button
Don`t copy text!