राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी जी, राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप सैकिया, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे आणि जयभानसिंह पवय्या, माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, विजया रहाटकर आणि पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे व माजी मंत्री आशिष शेलार व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आदी नेते एक दिवसाच्या कार्यकारिणी बैठकीत सहभागी झाले होते.

मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणे ही आपली भूमिका आहे. पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची आंदोलने झाली. एसटी कामगारांच्या संपात भाजपाचा सक्रीय सहभाग आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत.

ते म्हणाले की, सत्ताधारी महाविकास आघाडीने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. जवळ जवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही. त्रिपुरात जी घटना घडली नाही तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात, त्यासाठी पंधरा – वीस हजार लोक रस्त्यावर येतात व पोलिसांवर हल्ला करतात याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तरीही भाजपावर आरोप करतात. अंमलीपदार्थांचे समर्थन केले जाते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे.

मा. प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला. एकेकाळी लाल गहू मागणारा भारत आज मोदीजींच्या नेतृत्वामुळे साठ सत्तर देशांना कोरोनाची लस निर्यात करत आहे, असे ते म्हणाले.

मा. सी. टी. रवी म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमीवर हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदू समाजाचा अपमान केला जातो. सत्ताधारी पक्ष हिंदुत्व सोडून परिवार पार्टी झाला आहे. परिवाराचा विकास आणि महाराष्ट्राचा विनाश चालू आहे, हे दुर्दैव आहे. राज्यातील जनता दुःखी आहे आणि जनविरोधी सरकारला हटवायला उत्सूक आहे. हे नागरिकविरोधी सरकार लवकरच हटेल असा आपल्याला विश्वास आहे.

मा. सी. टी. रवी यांनी सांगितले की, राज्यातील जनतेने २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मते दिली. पण शिवसेनेने विश्वासघात केला. आता राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. आपले त्यांना आव्हान आहे की, हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्या, भाजपा निवडणूक जिंकेल.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मोदीजींनी देशात परिवर्तकारी बदल केले असून जनतेचा विश्वास हीच त्यांची पूंजी आहे, असे ते म्हणाले.

भाजपाचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला.


Back to top button
Don`t copy text!