गाडीत सापडलेले पन्नास हजार गाडी मालकांस परत; शरयु टोयोटामधील प्रकार


दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । बारामती । माळेगाव येथील मेडिकल व्यावसायिक असलेल्या रोहन भोसले यांनी आपली चारचाकी गाडी शरयु टोयोटो येथे सर्व्हिसिंगसाठी दिलेली होती.

गाडी देताना गाडीमध्ये ठेवलेले पैसे काढून घ्यायचे भोसले विसरून गेले. परंतु शरयु टोयोटाचे मनोज काळे व प्रतीक भोईटे यांनी प्रामाणिकपणे सदरील रक्कम भोसले यांना सुपुर्त केली.

शरयु टोयोटो येथील कर्मचारी यांनी सदरील पन्नास हजार रूपये आढळुन आले असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. चारचाकी गाडीचे सर्व्हिसिंग करताना सदरील रक्कम सापडली होती. वास्तविक गाडी सर्व्हिसिंगला सोडताना आपल्या मौल्यवान वस्तू व पैसे हे गाडीतुन काढून घेणे गरजेचे असते. परंतु भोसले यांच्याकडून पैसे काढून घ्यायचे राहिले. प्रामाणिक कर्मचारी कार्यरत असल्याने शरयु टोयोटो येथुन भोसले यांना त्यांचे पन्नास हजार रूपये परत मिळाले.

या वेळी ग्राहक सेवा अधीकारी गणेश मोरे, सेवा अधिकारी मंगेश सोनवले व अजित चव्हाण, धनंजय निंबाळकर, प्रमेशवर उकरंडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वर्कशॉप कर्मचारी मनोज काळे व प्रतीक भोईटे यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. आजच्या काळामध्ये प्रामाणिक पणा टिकून असल्याने पन्नास हजार परत मिळाल्याने समाधानी असल्याचे गाडीचे मालक रोहन भोसले यांनी सांगितले.

विक्री नंतर सेवा देताना ग्राहकांचा विश्वास जिंकणे महत्वाचे असल्याचे ग्राहक सेवा अधिकारी गणेश मोरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!