स्थैर्य, सातारा, दि. ०७ : जिल्हा रूग्णालयात गर्भपाताची घटना झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून सलग चौथी मुलगी असल्याची माहिती समोर येत आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. या बेकायदा कृत्याविरोधात कठोर कारवाई करावी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अॅड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा सल्लागार समिती व त्रिसदस्यीय समिती यांना याप्रकरणी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की सिव्हिल प्रकरणात लेक लाडकी अभियानच्यावतीने प्राथमिक माहिती घेतली आहे. मिळालेली माहिती धक्कादायक असून सिव्हीलमधील घटना बेकायदा असल्याचे स्पष्ट होत आहे. गर्भपात झालेली संबंधित महिला कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील आहे. त्या महिलेला पहिल्या तीन मुली आहेत. दि. २७ जुलै रोजी गर्भपात केलेली सुद्धा मुलगी म्हणजे चौथी मुलगी असल्याने तिचा गर्भपात करण्यात आला आहे. दहा दिवसानंतर सिव्हीलच्या स्वच्छतागृहाचे ड्रेनेज चॉकअप झाले. हे चॉकअप काढण्यासाठी प्रयत्न केले असता टॉयलेटमध्ये मानवी भ्रूण आढळून आले. यावेळी एका कर्मचाऱ्याने या घटनेचा व्हिडीओ केला.
तब्बल दहा दिवसानंतर ही घटना उघड झाली. गर्भपात केलेल्या महिलेची सोनोग्राफी कोणत्या लॅबोरेटरीत झाली? हे भ्रूण ड्रेनेजमध्ये आढळले कसे? यासाठी सिव्हिलमधील कोणत्या डॉक्टरने वा खासगीमधील डॉक्टरने मदत केली? या भ्रूण हत्येसाठी नक्की कोठून औषधे मिळाली? अशाप्रकारे त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. सिव्हिलमध्येच असे प्रकार होत असल्याने ही बाब चिंताजनक आहे. या प्रकरणात गर्भलिंग केल्यानंतर गर्भपात केला आहे. त्यामुळे ती, तिचा पती, सासू-सासरे यांच्यासह गर्भलिंग करण्यास मदत करणाऱ्यांवर पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी अॅड. देशपांडे यांनी केली आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार जिल्हा रुग्णालयात घडलेला असल्याने त्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर हे जबाबदार असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्वरित निलंबित करण्यात यावे. अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकाराचा व्हिडीओ करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. ही बाब पूर्णत: चुकीची आहे. यामुळे ‘चोर ते चोर अन् शिरजोर’ असा कारभार डॉ. गडीकर यांचा सुरु आहे. प्रशासनाने आम्ही दिलेले निवेदनच नोटीस समजावे, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी अॅड. शैला जाधव, माया पवार, स्वाती बल्लाळ, मालन कांबळे, कैलास जाधव उपस्थित होते.