दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२२ । फलटण । आपल्या शेतीमध्ये असणाऱ्या मातीचे परीक्षण करून घेणे व त्यासोबतच माती परीक्षणानुसार खताची मात्र पिकाला देणे. यामुळे पिकाचे उत्पादन वाढीस नक्कीच फायदा होतो. उत्पादन खर्च कमी करणे व मातीचे संवर्धन करत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हिरवळीची खते, शेणखताचा वापर जमिनीतील सेंद्रिय कार्ब वाढण्यास व जमीन सुपीक राहण्यास मदत होते, असे मत के. बी. एक्स्पोर्टच्या माती व पाणी परीक्षण तद्न्य कु. अनुजा कर्वे यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील सासकल येथे माती नमुना काढण्याचे प्रात्यक्षिक सदानंद मुळीक यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आले होते. यावेळी फलटण कृषि अधिकारी प्रमोद जाधव, विडणी मंडळ कृषि अधिकारी अमोल सपकाळ, सासकलच्या सरपंच सौ. उषा फुले, कृषि सहाय्यक सचिन जाधव, लक्ष्मण पाटील, कृषी महाविद्यालय फलटण येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम कृषि कन्या व प्रगतशील शेतकरी सदानंद मुळीक, संजय मुळीक, तुकाराम मुळीक तसेच पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व त्यांचे निरसन करण्यात आले. शेतकऱ्यांना शेतकरी मासिक व माती परीक्षण घडी पत्रिका वाटप करण्यात आल्या. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी जागतिक मृदा दिना निमित्त प्रस्तावना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी केले. मनोहर दिनकर मुळीक यांनी आभार मानले.