दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व खंडणीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या अनुराग राजेंद्र पाटील (रा. गोळीबार मैदान,सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तसेच शिरवळ परिसरात गावठी विक्रीसाठी येणार आलेल्या सौरभ सुनिल नवले, देवदत्त जयपाल कांबळे (दोघेरा.गुंडगे,ता.कर्जत,जि.रायगड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्यात 2020 साली दाखल झालेल्या दरोडा व खंडणीच्या गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित अनुराग पाटील हा फरारी होता. सातारा शहर पोलिसांनी वेळोवेळी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी सापडत नव्हता. अखेर त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या टिमने सापळा लावून गोडोली परिसरात पकडला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
तसेच शिरवळ परिसरात दोन युवक गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली होती. त्यानुसार धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. गर्जे यांनी कर्मचाऱ्यांसह शिरवळ येथील शिर्के पेपर मिलजवळ सापळा लावला होता. दरम्यान दि.26 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संशयित युवक हे (एमएच 46 एएस6883) या दुचाकीवरून त्याठिकाणी आले असता, पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले व अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे गावठी पिस्टल सापडले. त्यांच्याकडे त्या पिस्टलबाबत अधिक विचारणा केली असता त्यांनी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही संशयितांना सापडलेले पिस्टल, तीन मोबाइल, एक दुचाकीसह पुढील कारवाईसाठी शिरवळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, हवालदार अतिश घाडगे, सजंय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, रोहीत निकम,स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, वैभव सावंत, मोहन पवार यांनी केली.