महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने जूनमध्येच केली होती तक्रार; कामात यांच्या दबावाचा केला होता आरोप; वाचा सविस्तर


स्थैर्य, फलटण, दि. २४ ऑक्टोबर : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुमारे चार महिन्यांपूर्वी, १९ जून २०२५ रोजी, कामामध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून दबाव येत असल्याची लेखी तक्रार फलटणच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या एका व्यक्तीला पात्र ठरवण्यासाठी वारंवार दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला होता.

उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरने आपल्या तक्रार अर्जात नमूद केले होते की, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील वैद्यकीय तपासणीदरम्यान एका व्यक्तीला वैद्यकीयदृष्ट्या अपात्र (unfit) ठरवले असतानाही, एका अधिकाऱ्याने त्यांना वारंवार ‘पात्र’ (fit) घोषित करण्यासाठी दबाव टाकला.

या महिला डॉक्टरने अर्जात पुढे म्हटले आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला वारंवार फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून सदर व्यक्तीला पात्र ठरवण्यास सांगितले. मात्र, वैद्यकीय नियमांनुसार ते शक्य नसल्याचे सांगितल्यावर, वरिष्ठ अधिकाऱ्याने उर्मट भाषेत उत्तरे दिली (‘उडाउ-उडवीची उत्तरे दिली’) आणि या प्रकरणात काहीतरी ‘भानगड’ असल्याचा संशयही व्यक्त केला.

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या या वागणुकीमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

सदर महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणात लक्ष घालून योग्य कारवाई करण्याची आणि भविष्यात असा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली होती.

जून महिन्यातच ही गंभीर तक्रार दाखल होऊनही त्यावर पुढे काय कारवाई झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या तक्रारीनंतर अवघ्या चार महिन्यांतच संबंधित महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने, या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले गेले होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘स्थैर्य’ या वृत्ताला अधिकृत दुजोरा देत नसले तरी सुद्धा आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या कथित मजकुरातही पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप असल्याने, जून महिन्यातील या तक्रार अर्जाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.


Back to top button
Don`t copy text!