स्थैर्य, सातारा, दि. २४ : जुलैमध्ये हमखास असणारा पाऊस गायब झाला आहे. हंगाम पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांनी वरुण घेवडा, वाटाणा व इतर पिकांची पेरणी केली आहे. मात्र पाऊस गायब झाला असून कडक ऊन पडू लागल्याने फुलकळीत व जोमात आलेली पिके कोमेजू लागली आहेत. पाऊस हुलकावणी देत असल्याने ऐन भरात आलेले पीक वाया जाते की काय या भीतीने शेतकरी वर्ग आभाळाकडे डोळे लावून एका चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आस लावून बसला आहे.
कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मध्यम पावसाच्या आधारावर 15 जूनच्या दरम्यान बहुतांशी पेरण्या उरकल्या. परिसरात घेवडा, वाटाणा, बटाटा व कडधान्य ही पिकं घेतली जातात. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तुरळक पाऊस झाल्याने पिकं जोमात आली आहेत. शेतकर्यांनी वेळेत कोळपणी व खुरपणी केली आहे. सोबत पिके चांगली यावीत म्हणून अनेक शेतकर्यांनी तणनाशक व कीटकनाशकांबरोबर टॉनिक मारले आहे. बागायती पिकं सोडली तर इतर जिरायती शेतकरी औषधांच्या भानगडीत पडला नव्हता. मात्र कधी नव्हे ती यावेळी खतांच्या दुकानांत शेतकर्यांची झुंबड उडाली होती. सध्याचे संपूर्ण पीक पावसावर अवलंबून आहे. सध्या घेवडा पीक जोमात आले आहे. फुलकळीचा चांगला भर आला आहे. मात्र कडक उन्हात पाने माना टाकू लागली आहेत. अजून दोन-तीन दिवस अशीच परिस्थिती राहिली तर शेतकर्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या पिकांना एका पावसाची गरज आहे. जुलै महिना संपत आला तरी म्हणावा, असा पाऊस पडला नाही. गेल्या पाच-सहा दिवस कडक ऊन पडत आहे. त्यामुळे पाऊस नाही पडला तर पिके धोक्यात येऊ शकतात या काळजीने शेतकर्यांच्या तोंडी एकच शब्द येतो, अरे वरुण राजा कुठे गेला तू रं? एकंदर पिकांना एका चांगल्या पावसाची गरज आहे.