स्थैर्य, पांचगणी, दि. 18 : महाबळेश्वर येथील हवामान खात्याच्या वेधशाळेमधील पर्जन्यमापकासह अनेक मोजमापक यंत्रणेशेजारीच उंचच्या उंच पाण्याची टाकी उभी केल्याने हवामानाच्या अचूक निरीक्षणामध्ये धोका निर्माण होण्याची भीती हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांना वाटत असून ही टाकी त्वरित काढली जावी, अशी मागणी कृती मौसम विज्ञान विभाग, कुलाबा यांनी सातारा सिव्हिल सर्जन तसेच महाबळेश्वर येथील शासकीय आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षकांना एका पत्राद्वारे केली आहे.
महाबळेश्वर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारतीय मोसम विभाग संचलित कुलाबा वेधशाळेची (हवामान खात्याची) अत्याधुनिक मोजमापक यंत्रणा असलेली सुसज्ज वेधशाळा आहे तसेच मुख्य इमारती शेजारील मोकळ्या जागेत पर्जन्यमापकसह हवामान संबंधित विविध मोजमापक यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेले अनेक दशके ती या ठिकाणी आहे. त्याचे अविरत कार्य व निरीक्षण येथून सातत्याने सुरू असते. याच वेधशाळेशेजारी शासनाचे ग्रामीण रुग्णालय आहे. सध्या ते प्रायोगिक तत्त्वावर रेड क्रॉस संचलित बेल एअर हॉस्पिटला चालविण्यास दिले आहे. नुकतेच या हॉस्पिटलचे नूतनीकरण व अत्याधुनीकरण करण्यात आले. यावेळी वेधशाळेच्या पर्जन्यमापकसह हवामान संबंधित विविध मोजमापक यंत्रणेच्या शेजारीच एक उंच पाण्याची टाकी आरोग्य विभागाकडून उभी करण्यात आली असून तिचा दुष्परिणाम शेजारील तापमापन यंत्रणेवर होत आहे. त्यामुळे महाबळेश्वरातील हवामानाबाबतच्या रोजच्या निरीक्षणात व त्याची नोंद अचूकपणाने घेण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.
सध्या सर्वत्र मान्सून पावसाचे आगमन झाले असून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरही यास अपवाद नाही. येथेही सध्या जोरदार पाऊस बरसणे सुरू आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील ब्रिटिश काळापासूनचे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून येथील थंडी, उन्हाळा तसेच पावसाळा आदी काळातील हवामान बदलाच्या रोजच्या अचूक नोंदी यांना स्थानिकासह राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व आहे. या हवामानाच्या बदलाचे निरीक्षण व त्याची रोजची नोंद या खात्याचे तज्ञ वरील अत्याधुनिक यंत्रणा व मोजमापकांकरवी दररोज सकाळी साडे आठ वाजता, सकाळी साडे अकरा वाजता, दुपारी अडीच वाजता तसेच सायंकाळी साडे पाच वाजता येथील किमान -कमाल तापमान, पाऊस, दवबिंदू, हवेतील आद्रता, वाफ दाब, हवेची दिशा व त्याचा वेग, ढगांचे प्रकार (खराब हवामान), वीज, धुके व व्हीजीबिलीटी इत्यादीची नोंद करत असतात. डिझास्टर यंत्रणा, एन. डी.सी.(नेशनल डेटा सेंटर), पुणे शिवाजीनगर, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्लू. एम.ओ.), विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदी महत्त्वाच्या ठिकाणी पाठविले जातात.
जागतिक पातळीवर याच्या मोजमापनाच्या निरीक्षणाच्या नोंदीची देवाण- घेवाण चालू असते. या दृष्टीने येथील या हवामान खात्याच्या तज्ञांच्या नोंदीला विशेष महत्त्व असते तसेच महाबळेश्वर हे महत्त्वाचे पर्यटनस्थळही असल्याने या संपूर्ण नोंदींना त्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. मात्र या सर्व मोजमापक यंत्रणेच्या शेजारीच महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाने पाण्याची सुमारे 25 ते 30 फुटावर पाण्याची टाकी ठेवल्याने त्याचा परिणाम या मोजमापक उपकरणांवर होत असून हवामानाच्या रोजच्या निरीक्षणात व त्याचा अचूक नोंदीमध्ये प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाच्या नोंदीवर त्याचा परिणाम होण्याचा फार मोठा धोका येथील काम करणार्या तज्ञांना वाटत आहे.
दरम्यान, कुलाबा वेधशाळेच्या संबंधित तज्ञांनी याबाबतचा धोका एका पत्राद्वारे या पूर्वीच सिव्हिल सर्जन, सातारा, वैद्यकीय अधीक्षक व मॅनेजमेंट मोरारजी गोकुळदास हॉस्पिटल, महाबळेश्वर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना कळवले असून पाण्याची टाकी व टाकी बसविलेला लोखंडी मनोरा त्वरित काढून टाकावा अशी मागणी केली आहे. मात्र याबाबत संबंधित खात्यामार्फत कोणतीही हालचाल होत नाही. त्यामुळे चिंता वर्तवली जात आहे.