सोमवारपासून खाजगी वाहनांनी पार्किंग केल्यास पडणार भुर्दंड
स्थैर्य, सातारा, दि. 21 : सातारा तालुका व प्रांत कार्यालयाच्या आवारात आता खाजगी वाहनांना आजपासून (दि. 22) नो एन्ट्री असून याठिकाणी वाहन आढळून आल्यास चाकातील हवा सोडली जाईल व पोलिस विभागाच्या ताब्यात दिली जाईल, असा इशाराच प्रांत प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ज्यांच्या लाखो रुपयांचा महसूल तर पाहिजे पण त्यांच्या वाहनांची मात्र, अडचण होतेय, असा हा कारभार असल्याने वाहन चालकांतून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, भुमीअभिलेख कार्यालये एकाच ठिकाणी आहेत. येथे मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येतात. या कामापोटी लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत असतो. मात्र, शासनाला लोकांकडून कर तर हवा आहे मात्र, त्यांची वाहने कार्यालयासमोर का नको, असा सवाल नागरिक करत आहेत.
महसूल प्रशासनाने चोरटी वाळू वाहतूक करणार्या अनेक वाहनांवर कारवाई केल्यानंतर ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली न काढल्यामुळे ती महिनोंन महिने कार्यालयाच्या आवारातच धुळखात पडून असतात. त्यामुळे या ट्रॅक्टर, जेसीबी, डम्पर आदी वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर जागा अडून राहते. तेव्हा हे अधिकारी तिकडे दुर्लक्ष करतात मग खाजगी वाहनाधारकांची वाहने त्यांच्या डोळ्यात कधीपासून खुपू लागली आहेत. जप्त केलेली वाहने पडून ठेवण्यापेक्षा ही प्रकरणे निकाली काढून खाजगी वाहनांच्या पार्किंगसाठी उपलब्ध करण्याची गरज आहे.
प्रांत प्रशासनाने मागील बाजूचा रस्ता बंद केला आहे. त्याठिकाणी माणसांची ये-जा बंद झाली तर तेथे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. ते झाल्यास प्रांताधिकारी व तहसीलदार याची जबाबदारी घेणार काय?
शासकीय कार्यालयात अनेकजण बाहेर गावातून येत असतात. यात महिला व ज्येष्ठ नागरिकही असतात. याठिकाणी कुठलेली काम एका हेलफाट्यात होत नाही. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना याठिकाणी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. बसस्थानकासमोर पे-अँड पार्किंगमध्ये किंवा पारंगे चौकात गाडी लावून तेथून चालत येताना ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.