दैनिक स्थैर्य | दि. 18 डिसेंबर 2024 | सातारा | “मटण खायला घालत नाही” या कारणावरून कासारवाडी (ता. माण) येथे एकाने आपल्या वडिलांना खून केल्याची घटना २९ एप्रिल २०२२ मध्ये घडली होती. याप्रकरणी वडूज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मुलास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नटराज पांडुरंग सस्ते (वय २९) असे गुन्हेगाराचे नाव आहे.
नटराज सस्ते हा मटण खायला का घालत नाही, असे म्हणून वडील पांडुरंग बाबूराव सस्ते (वय ७०) यांच्याशी भांडत होता. मुलगा अंगावर धावून आल्याने वडील घरातून बाहेर निघून भंडारदरा मळवी नावाच्या शिवारात पळत गेले. त्यांच्यापाठोपाठ नटराज सस्ते हा घरातून हातामध्ये कुऱ्हाड घेऊन गेला. नटराजने वडिलांवर कुऱ्हाडीने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक देवानंद तुपे यांनी साक्षीदारांचे जबाबनोंदवले व वैद्यकीय पुरावे जमा केले, तसेच कसून तपास करून आरोपीविरुद्ध वडूज जिल्हा सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात याकामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अजित कदम (साबळे) यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात आले.
साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस. एन. कोले यांनी नटराज सस्ते याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. खटला चालवण्याकामी प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलिस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार, जयवंत शिंदे व दया खाडे यांनी सहकार्य केले.