दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । लोणंद । लोणंद रेल्वे स्टेशन नजीक रविवारी सांयकाळी रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरी ता खंडाळा येथील एसआरपी मध्ये कार्यरत असणारा २८ वर्षीय तरुणाचा व त्याच्या एक वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. या घटनेची नोंद सातारा रेल्वे पोलीस स्टेशनला करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते.
या घटनेबाबत रेल्वे पोलीसाकडुन व घटना स्थळावरून मिळालेली आधिक माहिती अशी की अंदोरी,ता. खंडाळा शैलेश ज्ञानेश्वर बोडके वय २८ हा तरुण धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत आहे. तर त्यांची पत्नी मुंबई पोलीस दलामध्ये आहे. शैलेश बोडके हा सुट्टी घेऊन दोन दिवसापुर्वी अंदोरी येथे घरी आला होता. शैलेश बोडके हा त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेला. यावेळी गांधीधाम फेस्टीवल ५१ एक्सप्रेस रेल्वे गाडी नंबर ०६५०६ या रेल्वेच्या धडकेमध्ये शैलेश बोडके व त्याच्या एक वर्षाच्या रुद्र बोडके या मुलाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.
या घटनेनंतर सपोनि व्ही आर पाटोळे,पी एन भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते. रेल्वे पोलीसानी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात या बापलेकाचे शवविच्छेदन करुन मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईच्या ताब्यात दिला आहे. या घटनेत बापलेकाचा दुर्देवी मृत्यु झाला असल्याने अंदोरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.