दैनिक स्थैर्य | दि. १ जुलै २०२३ | बुलढाणा |
नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणार्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरूप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरूप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.
बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही
बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले. पोलीस आणि घटनास्थळी असलेल्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणार्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढे जाऊन येणार्या आणि जाणार्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता.मृतदेहांची ओळख पटवणे अडचणीचे
अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे. त्यामुळं एक तर डिझेल टँक फुटली असावी किंवा डिझेल टँक मधून इंजनकडे सप्लाय होणारा पाईप फुटला असावा, त्यामुळेचं बसने पेट घेतला असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. जे लोक बचावले आहे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला आहे. बसमधून २५ मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. जे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे.राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार
बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.