दैनिक स्थैर्य | दि. ३० सप्टेंबर २०२३ | फलटण |
आज पाणी जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढाच पाऊस महत्त्वाचा आहे. गेली चार-पाच वर्षे बघितले तर नक्षत्रावर पडणारा पाऊस आता राहिलेलाच नाही. पाऊस आज अनिश्चित झालेला आहे. त्यामुळे शेतकर्याच्या पिकाला भाव देताना त्याला जागतिक तापमानवाढ याविषयी माहिती देऊन येणार्या काळात तशी वातावरणाला अनुकूल पिके घेऊन शेती करणे आवश्यक ठरणार आहे, हे सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा जेष्ठ नेते विजयराव बोरावके, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, बाजार समितीचे उपसभापती भगवान होळकर, सचिव शंकरराव सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत रामराजे आपल्या मनोगतात म्हणाले की, सरकार शेतकर्यांसाठी यापुढे काही करेल, ही अपेक्षा ठेवू नका. मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार असू द्या. त्यामुळे मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकर्याला कसा जास्तीत जास्त फायदा होईल, हे बघितले पाहिजे. शेतकर्याला वातावरणीय बदलाबाबत माहिती देण्यासाठी, त्यानुसार पिके घेण्यासाठी मार्केट कमिटीमध्ये एक सेल तयार करा. आज फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऑनलाईन ट्रेडिंग सुरू झाले आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. यापुढे ऑनलाईन ट्रेडिंगद्वारेच शेतकर्याला जास्तीत जास्त दर देता येणार आहे. मार्केट कमिटी आज चांगले काम करत, हे श्रेय रघुनाथराजेंनाच जाते. त्यांनी आज मार्केट कमिटीचा व्यवहार पारदर्शक करून चांगल्या स्थितीत आणला आहे. मार्केट कमिटीच्या कामगारांचे, हमालांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला आहे. सरकार आपल्या पद्धतीने काम करत असते, मात्र, आपण सरकारवर चांगले निर्णय घेण्यासाठी दबाव आणला पाहिजे. यासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढे यावे, अशी माझी सूचना आहे.
फलटण बाजार समितीसाठी शेतकर्यांचे हित महत्त्वाचे – श्रीमंत रघुनाथराजे
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आज वर्ग ‘अ’ मध्ये असून कर्जमुत आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चार पेट्रोलपंप चालू झालेले आहेत. सहा पेट्रोलपंप चालू होण्याच्या मार्गावर आहेत आणि दोन पेट्रोलपंप साधारण दीड ते दोन वर्षात सुरू होतील. अशा पद्धतीने फलटण तालुयाच्या प्रत्येक रस्त्यावर आज मार्केट कमिटीचे अस्तित्व दिसू लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवसाय वाढण्यासाठी आज आपण अनेक प्रयत्न करत आहे. त्यामध्ये बाजार समितीत येणार्या व्यापार्यांसाठी राहण्यासाठी व जेवणासाठी हॉटेल सुरू करत आहोत. भाजीपाला व फळांसाठी नवीन गाळे तयार करत आहोत. आपल्या बाजार समितीत जास्तीचे दर देणारे व्यापारी कसे येतील, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच कापसाच्या बाबतीत मार्केट कमिटीचे दुर्लक्ष होणार नाही, याची खात्री बाळगा. फलटण नगरपालिका हद्दीतील शेतकरी व मार्केट कमिटीचे शेतकरी, फलटण शहरातील गरीब वर्ग यांच्यासाठी लवकरच मार्केट कमिटीमार्फत महाराजा प्रतापसिंह मालोजीराव दवाखाना सुरू होईल, त्याचे काम प्रगतिपथावर आहे. बाजार समितीमार्फत शेतकर्यांसाठी रामराजे शेतकरी निवारण कक्षाची जी निर्मिती आपण सात वर्षांपूर्वी केली, ती आपण यशस्वीपणे चालवत आहोत. ज्यांच्या कुणाच्या वीज वितरणबद्दल, मोजणी खात्याबद्दल किंवा इतर बाबींबद्दल समस्या असतील, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा.
‘जय जवान, जय किसान’ हे ब्रीद घेऊन आपण जे कोणी आजी-माजी सैनिक आहेत, ज्यांची कामे अडली आहेत, त्यांचीही कामे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्यासाठी कटीबध्द आहोत. कोणत्याही शेतकर्याचे किंवा सैनिकाचे काम अडलेले असेल त्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा, अशी मी विनंती करतो, असे रघुनाथराजे म्हणाले.
गाळ्यांचा प्रश्न रामराजेंनी मार्गी लावला आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समिती प्रगतिपथावर आहे, याची ग्वाही मी आज या ठिकाणी देतो. आज श्रीमंत रामराजेंना विनंती करतो की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एक योग्य कार्यक्रम आखावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांमार्फत पवार साहेबांशी चर्चा केली होती. आपणही त्याचा पाठपुरावा करून हा प्रश्न धसावा न्यावा, अशी आमची मागणी आहे. शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती एक चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची नेतेमंडळींनी नोंद घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बाजार समितीमार्फत एखादा वकील नेमून त्याला अर्थसहाय्य करता येऊ शकते. तसेच शेतकर्यांच्या मुलांसाठी कोणती साईट घेतली पाहिजे किंवा कोणते कोर्स केले पाहिजे, यासाठी मार्गदर्शन करणार्या व्यतींची नेमणूक करणे, या गोष्टी करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे शेतकर्यांची बियाणे कंपन्यांकडून होणारी फसवणूक थांबणार आहे व फसवला जाणारा शेतकरी मार्केट कमिटीमार्फत न्याय मागू शकतो. खाजगी सावकारीतून त्याची फसवणूक थांबू शकते, असे मला वाटते, असे रघुनाथराजे म्हणाले.
या वार्षिक सभेस मार्केट कमिटीचे संचालक, कामगार तसेच शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.