दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । पुणे- बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे बाधीत शेतकऱ्यांच्या बाधीत क्षेत्राला खाजगी वाटाघाटीने एकरी दोन कोटी किंवा चालू बाजारभावाच्या दहापट मोबदला मिळावा , बाधीत क्षेत्रातील बांधकामे , विहिरी , बोअरवेल , पाइपलाइन , फळझाडे ,फळबागा यांचे चालू बाजारभावाप्रमाणे योग्य मूल्यांकन करून त्याच्या चारपट मोबदला मिळावा , प्रत्येक गावातील महामार्ग बाधीत शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तो पर्यंत ग्रीनफिल्ड हायवे चे कसलेही काम कुठल्याही बाधीत गावच्या हद्दीत सुरू करू नये या व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे बाधीत शेतकरी संघर्ष समिती सातारा जिल्हा यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील खंडाळा , कोरेगाव ,खटाव व फलटण चार तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी काढण्यात आला.
आपल्या मागण्यांचे फलक हातात घेऊन हा मोर्चा सातारा येथील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे , शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई समीर देसाई आणि संघर्ष समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले. मोर्चात सहभागी झालेल्या बाधित शेतकऱ्यांना भाई दिगंबर कांबळे , भाई समीर देसाई , रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले मोर्चाच्यावतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते काम सुरू करू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण , कोरेगाव , खटाव या तालुक्यातील साठ गावांमधून जात आहे. मोर्चामध्ये एम आर जाधव , दिनकर गुरव , विठ्ठल ठोंबरे , ओंकार ठोंबरे , प्रकाश धुमाळ ,डॉ.किशोर शिंदे , राहुल सणस ,अनिल शिंदे , तानाजी शिंदे , शामराव पाटील , राजाराम पाटील , प्रशांत यादव , उद्धव मोहिते आदींसह शेकडो बाधित शेतकरी सहभागी होते.