
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। सातारा। गायरान जमीनी खासगी ठेकेदारांना नाममात्र भाड्याने देण्याच्या सरकारच्या धोरणांवर थेट प्रहार करत शेतकर्यांनी आता निर्णायक लढाईचा इशारा दिला आहे. महसूल आणि महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘गायरान वाचवा’ मोहिमेंतर्गत कराड ते सातारा लाँग मार्च काढण्यात आला. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले असून, 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी मंत्रालयावर हल्लाबोल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, गायरान जमीन ही गावकर्यांची असते, सरकारच्या मालकीची नाही. ही जमीन नाममात्र भाड्यात महावितरणला देऊन, त्यांनी ती खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. आम्ही हा डाव हाणून पाडल्याशिवाय थांबणार नाही. सरकारला जागं केल्याशिवाय माघार नाही, असा थेट इशारा सुशांत मोरे यांनी दिला.
गायरान वाचवण्यासाठी, तसेच शासनाला सुबुद्धी द्यावी आणि हा प्रकल्प त्वरित रद्द करावा, यासाठी शेतकरी, युवक आणि महिलांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी कराड येथील समाधीस्थळी अभिवादन करून लाँग मार्च सुरू केला. कराडपासून निघालेला हा लाँग मार्च सातार्यातील शिवतीर्थ येथे पोहोचला.
शासनाने राज्यभरातील हजारो एकर गायरान जमीन महावितरणला दिली, मात्र त्यानंतर महावितरणने ही जमीन खासगी ठेकेदारांना सुपूर्द केली. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार असून, शेतकर्यांना हक्काच्या जमिनीतून बेदखल करण्याचा हा कट आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अनेक गावांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असतानाही सरकारने ठेकेदारांच्या बाजूने भूमिका घेतल्याने संतप्त शेतकर्यांनी आता निर्णायक संघर्ष पुकारला आहे.