स्थैर्य, सातारा, दि. 02 : सध्या देशभरात करोना सारख्या घातक विषाणूने थैमान घातल्यामुळे देश संकटात सापडला आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याच्या शेतीमालाची विक्री होत नसल्यामुळे शेतकरी राजा सुद्धा संकटात सापडला आहे. माण तालुक्यात गेल्या वर्षी कांद्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात चांगली प्रगती झाल्यामुळे या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा पिकाची मोठय़ा प्रमाणात लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले. मात्र करोना सारख्या भयानक विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. तरी सुद्धा करोनाचा वाढता प्रादुर्भाव कुठे कमी होताना दिसत नाही. यामुळे कांद्याचे बाजार जागीच ठप्प झाल्यामुळे व वाहतूक थांबल्यामुळे सध्या बाजारपेठेत कांद्याचे भाव पूर्ण पणे डासळले आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकराऱ्यांनी कांदा साठवण करून दर वाढीच्या प्रतीक्षेत बसले आहेत.
माण तालुक्यात या वर्षी कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे दर मात्र ढासळले आहेत. ऐन दुष्काळात कमी पाण्यात कांद्याचे पीक घेत काहीतरी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती काही अंशतः सुधारेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले. शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून उत्पादन घेतले. त्यातच देशात करोनाचा विळखा घट्ट आणि मजबूत होत असून लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे बाजारपेठा बंद झाल्या. शेतकऱ्यांचा शेतीमाल तयार झाला परंतु लॉकडाऊन व विक्रीअभावी तो शेतातच राहताना दिसत आहे. योग्य प्रमाणात बाजारभाव नसल्यामुळे केलेली आर्थिक गुंतवणूक सुद्धा मिळत नाही. म्हणून काही शेतकऱ्यांनी आजपासून कांदा पीक घ्यायचे नाही असा निर्धार सुद्धा केला आहे. सध्या कांदा बाजारभाव पाचशे ते सातशे रुपये मिळत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी घेतलेल्या उत्पादनात आज नाही तर उद्या दर वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करून ठेवला असताना दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक हि झाडाच्या सावलीमध्ये उघडय़ावर व गोनिमध्ये भरून ठेवला आहे. तसेच कांद्याची चाळ किंवा आडी करून, शेडमध्ये, झाडाखाली उसाच्या पाचटी खाली दफन केला असताना दिसून येत आहे. मात्र शेतकऱ्यांना कधी चांगला बाजारभाव मिळेल या प्रतीक्षेत सर्वजण बसले आहेत. काही शेतकऱ्यांनी कांदा साठवणीसाठी स्वतंत्र शेड बांधून त्यामध्ये कांदा साठवणूक केली आहे पण साठवणूक केलेला कांदा एक ते दोन महिन्याच्या वर सुरक्षित राहू शकत नसल्यामुळे शेतकरी आहे त्या दरात समाधान मानून बाजारपेठेत विक्री केली जात आहे. कांदा घरी ठेवून खराब होण्यापेक्षा त्याची मिळेल त्या दरात विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय उरला नाही.
कांदा दर वाढीच्या प्रतीक्षेत बसल्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक उलाढाल झाली नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. माण तालुक्यातील सर्व कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी सोलापूर, नागपूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी जात आहेत. परंतु जिल्हा बंदीमुळे वाहतूक थांबली आहे. वाहतूक खर्च व उत्पादन खर्च वगळता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच शिल्लक राहत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होताना दिसून येत आहे व कधी दर वाढेल या प्रतीक्षेत शेतकरी बसला आहे.