स्थैर्य, सातारा, दि. ३० : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे हस्ते नुकतेच पुणे -बेंगलोर हायवे वरील हौसाई अॅग्रो टुरिझम चे मालक श्री. जीवन मांढरे यांना यु.पी.आय. QR कोडचे वितरण करणेत आले. यावेळी बँकेचे डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महाराष्ट्रामध्ये यु.पी.आय. व आधुनिक डिजिटल बँकिंग सेवेसाठी अग्रेसर बँक म्हणून ओळखली जात आहे. बँकेचे नुकतेच भीम यु.पी.आय. वर नोंदणी झालेली आहे. बँक ग्राहकांच्या सोयीकरिता एटीएम, पॉज, मोबाईल बँकिंग, बीबीपीएस, आरटीजीएस, एनईएफटी इ. सुविधा देत आहे. तसेच ३२० शाखा व ४८ एटीएम च्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर व गुणात्मक सेवा देणेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. बँकेने १ नोव्हेंबर २०२० ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाखांमधून डिजिटल बँकिंग पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या कालावधीमध्ये बँकेचे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, व इतर व्यावसायिक ग्राहकांना बँकेमार्फत मोफत QR कोडचे वितरण केले जाणार आहे. बँक युपीआय सव्र्हरला लिंक झालेमुळे ग्राहकांना गुगलपे, फोनपे, पेटीएम, फ्री चार्ज, जिओ मनी द्वारे फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ई-कॉमर्स, रक्कम वर्ग करणे इत्यादि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. बँकेच्या QR कोडचा वापर केलेने व्यवहार झालेनंतर क्षणार्धात ग्राहकाच्या खात्यावर व्यवहाराची रक्कम वर्ग होणार आहे. जिल्हा बँकेच्या युपीआय सुविधेचा लाभ जिल्हयातील ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकरी, व्यावसायिक, सभासदांनी घ्यावा असे आवाहन केलेले आहे.
बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे म्हणाले, बँकेने ग्राहकांना २०१३ मध्ये डिजिटल बँकिंग सेवा देणेस सुरुवात केलेली असून यामध्ये काळानुरुप झालेले बदलानुसार ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा देणेचा प्रयत्न केला आहे. बँकेच्या रूपे डेबिट कार्ड धारण केलेल्या बचत ठेव, चालू ठेव, के.सी.सी., खातेदार ग्राहकांना भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, फ्री चार्ज, जिओ मनी द्वारे बँकेच्या खात्याची जोडणी करता येणार असून रक्कम हस्तांतरण क्षणार्धात सुरक्षित रित्या होणार असलेचे त्यांनी सांगितले. याबाबत बँकेच्या ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात असून नाबार्ड व आरबीआय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भीम युपीआयवर नोंदणी झालेली आहे. त्यामुळे बँकेच्या गुणात्मक दर्जामध्ये वाढ झालेली असलेचे सांगितले.
यावेळी व्यावसायिक श्री. जीवन मांढरे यांनी तातडीने सदर सुविधा उपलब्ध करून दिले बद्दल बँकेचे आभार मानले. याप्रसंगी बँकेचे आयटी विभागातील प्रोजेक्ट व्यवस्थापक श्री. प्रकाश टकले, उपव्यवस्थापक श्री. भास्कर निकम, श्री. प्रशांत देशमुख उपस्थित होते.