दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । गोखळी । ऊस पिकाचे उत्पादन वाढविण्याचे दृष्टीने नॅनो युरिया वापराबरोबर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केले.
गोखळी, ता. फलटण येथे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को – ऑप. लि., (इफको) आणि गोखळी विकास सोसायटी यांच्या संयुक्त सहभागाने जगातील पहिले नॅनो टेक्नॉलॉजी वर आधारित ऊस पिकावर ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे खत फवारणी प्रात्यक्षिक आणि शेतकरी सभेत श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर बोलत होते. यावेळी बजरंग खटके, आसू सोसायटी चेअरमन रवी पवार, श्रीराम बझारचे संचालक मारुतराव गावडे, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके, तानाजी गावडे पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, दिलीप गावडे, शिवाजी शेडगे, संजय वरे उपस्थित होते.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर संदीप रोकडे यांनी प्रास्तविकात द्रवरुप नॅनो युरिया आणि पारंपरिक युरिया यातील फरक समजावून देताना पारंपारिक युरिया पर्यावरणाला प्रदूषित करतो तसेच हवेचे प्रदूषण करणारे अमोनिया आणि नायट्रस ऑक्साईड हवेमध्ये सोडतो त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होते तसेच पारंपारिक युरीया विरघळल्यानंतर तयार होणारे नायट्रेट जास्तीच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन पिण्याच्या पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित करतो, पारंपारिक युरियाची कार्यक्षमता ३० टक्के पर्यंत असते या ऊलट नॅनो युरियाचा वापर केल्याने नत्राचे नॅनो कण पिकांच्या पानामार्फत शोषले जातात आणि पाण्याच्या पेशींच्या पोकळी मध्ये साठवले जातात व नंतर पिकांच्या गरजेनुसार त्याचे नायट्रेट मध्ये रुपांतर होऊन नत्र पिकाला उपलब्ध होते, नॅनो युरियाची कार्यक्षमता पारंपारिक युरीयाच्या तीन पट म्हणजे ९० टक्के पर्यंत वाढते, नॅनो युरिया मुळे हवा पाणी आणि जमीन यांचे कोणतेही प्रदुषण होत नाही तसेच वापरण्यास व हाताळण्यासाठी सोपा व कमी खर्चिक असल्याचे रोकडे यांनी सांगितले.
या प्रसंगी नॅनो युरिया या खताच्या ऊस पिकावरील ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक गोखळी विकास सोसायटी चेअरमन तानाजी गावडे यांच्या शेतातील ऊस पिकावर घेण्यात आले. मारुती गावडे, संतोष खटके यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यास भाजपक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, रमेश गावडे, रघुनाथ ढोबळे, अनिल धुमाळ, प्रभाकर गावडे, सुहास पवार, बाळासाहेब गावडे, यांच्या सह गोखळी, आसू, पवारवाडी आणि पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
गोखळी विकास सोसायटी सचिव दिगंबर घाडगे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.