दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२३ । सातारा । आज शेतकऱ्यांकडे मोबाईल आहे. मोबाईलचा वापर हवामान, बाजार भाव याची माहिती घेण्यासाठी करावा असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी केले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर, कृषि विकास अधिकारी विजय माईनकर, फलटणचे विभागीय कृषि अधिकारी कैलाश धुमाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शासन शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगून श्री. घुले म्हणाले, या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कृषि विभागाने या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. शेतात नवनवीन प्रयोग करण्यासाठी सकारात्मक भूमिका ठेवावी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री घुले यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषि व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मिती मधील योगदानाबद्दल माहिती दिली. तसेच कृषि विकास अधिकारी श्री. माईनकर, आत्माचे श्री बंडगर, फलटणचे विभागीय कृषि अधिकारी श्री धुमाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सेंद्रिय व आधुनिक शेती मध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा डॉ. जे. के. बसू सेंद्रिय व आधुनिक शेती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कराड तालुक्यातील बेलवाडीचे मच्छिंद्र फडतरे यांनी पहिल्या क्रमांकाचा पुरस्कर प्राप्त झाला. तसेच उत्कृष्ट कृषि अधिकारी व उत्कृष्ट विस्तार अधिकारी यांचा सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाळासाहेब केवते यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रय येळे यांनी केले.