
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा । गेल्या काही वर्षामध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत असल्याचे दिसून येत आहे. परंतू पर्जन्य कालावधी, पर्जन्याची तीव्रता व पर्जन्याची वारंवारता या मध्ये बदल झालेले दिसून येत आहेत. पेरणी करताना अथवा पेरणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा किंवा वापसा नसेल तर बीयाण्याच्या उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. जिल्ह्यातील सद्यस्थितितील हवामान पाहता 80 ते 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय व जमिनीमध्ये पुरेसा ओलावा (वापसा) असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
माहे जून अखेर जिल्ह्याचे सर्वसाधारण सरासरी पर्जन्य 194.1 मि.मी. आहे. परंतू या वर्षी माहे जून अखेर प्रत्यक्ष 78.6 मि.मी. म्हणजे फक्त 40 टक्केच पाऊस झालेला आहे. यामुळे जिल्ह्यातील ज्वारी व बाजरी पिकाची पेरणीसुध्दा फक्त 10 ते 12 टक्केच झालेली आहे.
जिल्ह्यामधील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढ होताना दिसून येत आहे. सोयबीन पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया करणे अत्यंत गरजेचे आहे. सोयाबीन प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम या प्रमाणात थायरमची बीजप्रक्रीया करावी. यामुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. रायझोबीअम व पी.एस.बी. जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रती 10 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रकीया करावी. पेरणीपूर्वी तीन तास अगोदर ही बिजप्रक्रीया करुन बियाणे सावलीत सुकवावे व नंतर त्याची पेरणी करावी. बियाण्याची परेणी 3 ते 4 सें.मी. खोलीपर्यंतच करावी. सोयबीन बियाणे अत्यंत नाजुक असुन बियाण्याची उगवणक्षमता तपासून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे पेरणीसाठी निवडावे. याबाबत अधिक माहितीसाठी नजीकचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे अवाहनही श्री. राऊत यांनी केले आहे.