दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सातारा । शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी या पिकाखाली क्षेत्र वाढवण्यासाठी उत्सुक आहेत. सोयाबीनची पेरणी कधी करावी याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत. योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीत पुरेशी ओल आल्यावरच पेरणी करावी.
पेरणीसाठी सोयाबीनच्या बियाण्यांचे प्रमाण हेक्टरी 75 किलो ग्रॅमवरुन 50 ते 55 किलोग्रॅमवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा बी.बी. एफ. प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सोयाबीन पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेची आहे. प्रति किलो 3 ग्रॅम या प्रमाणात थायरमची बिजप्रक्रिया करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी.
पेरणीपूर्वी तीन तास अगोदर ही प्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे व नंतरच त्याची पेरणी करावी. बिण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजुक असून बियाण्याची उगवणक्षमता तपासून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे पेरणीसाठी निवडावे. याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.