दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकर्यांनी आपली आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या घोषवाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२३-२४ राजुरी, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. २३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सदरील शिबिराच्या चौथ्या दिवशी शासनाच्या ‘विविध कृषि योजना’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे बोलत होते.
श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी शेतकर्यांनी विविध शासकीय योजनांची तसेच नवनवीन अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून आयोजित मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजुरी गावातील शेतकर्यांना केले.
प्रास्ताविक करताना व्याख्यानाची पार्श्वभूमी व मार्गदर्शकांचे ओळख याबद्दल सविस्तर माहिती श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण तथा माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा उपस्थित होते.
उपविभागीय कृषि अधिकारी श्री. सुहास रणसिंग यांनी मार्गदर्शन करताना कृषी उत्पादने, शेतीनिगडीत औजारे, शेतीसंबंधी उद्योग, मविमच्या महिला बचतगटांच्या योजना, केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी योजना या विषयावर सर्व उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. धनंजय पवार, चेअरमन, फलटण तालुका दुध पुरवठा संघ यांनी शेतकरी लाभदायक शासनाच्या योजनांचे महत्त्व लक्षात घेवून व कृषी खात्यातील अधिकार्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
या शिबिरास श्री. शिवाजी पवार, विद्यमान सरपंच, राजुरी ग्रामपंचायत, श्री. युवराज रणदिवे, उपसरपंच, राजुरी ग्रामपंचायत, श्री. जयकुमार इंगळे, अध्यक्ष, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, डॉ. बाळासाहेब सांगळे, चेअरमन, श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, श्री. कांतीलाल खूरंगे, संचालक, फलटण तालुका शेतमाल व फळ प्रक्रिया उद्योग, कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, राजुरी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले व स्वयंसेवक उपस्थित होते.
सूत्रसंचालन कु. साक्षी जाधव हिने केले, तर आभार प्रा. सागर तरटे यांनी मानले.