दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । सातारा । ज्या पाणंद रस्त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे विशेषतः काँक्रीटीकरण करावयाच्या रस्त्याची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे. तसेच पाणंद रस्ते करताना काही स्थानिक अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून स्थानिक प्रशासनाला मदत करावी असे आवाहनही केले.
जिल्हाधिकारी डुडी यांनी पाटण पंचायत समिती येथील सभागृहात तालुक्यातील मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. पाटण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांचेकडे विभागून देण्यात आलेल्या 76 रस्त्याबाबत सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील ,प्रभारी गटविकास अधिकारी मीना साळुंके व इतर विविध विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी तसेच ग्रामसेवक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, पाटण तालुक्यात बांबू लागवडी साठी मोठ्या प्रमाणात वाव असून त्यासाठी गट विकास अधिकारी पाटण , तसेच सामाजिक वनीकरण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे. सामाजिक वनीकरण विभागाने स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणी नुसार सबंधित विभागांना लागवडी लायक रोपे उपलब्ध करून द्यावीत. प्रत्येक गावात किमान 2 हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली यावे यासाठी ग्रामसेवकांनी आवश्यक कार्यवाही करावी, या कामात स्थानिक तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल यांनी मदत करावी.
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांनी आडूळ पेठ येथील काम पूर्ण झालेल्या पाणंद रस्त्याची पाहणी केली. तसेच पाटण शहरात सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सातारा जिल्ह्यात पावसाची सुरवात झाली असून पाटण तालुक्यात अतिवृष्टी किंवा भूस्खलनची शक्यता लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी निर्देशीत केले.