दैनिक स्थैर्य । दि. 02 डिसेंबर 2021 । फलटण । सत्यम जिरेनियम आणि सुगंधी वनस्पती तेल उत्पादनाचे प्रक्रिया केंद्र राजाळे येथे सुरु झाले असून शेतकर्यांनी या नगदी पिकाची लागवड करुन पारंपारिक शेती पद्धतीला नवीन पर्याय म्हणून हा प्रयोग आपल्या शेतात करावा, असे आवाहन इंदापूरचे सहाय्यक निबंधक जे.पी.गावडे यांनी केले.
राजाळे, ता.फलटण येथे सत्यम जिरेनियम आणि सुगंधी वनस्पती तेल उत्पादन प्रक्रिया केंद्राचा शुभारंभ संपन्न झाला. त्यावेळी जे.पी.गावडे बोलत होते. यावेळी कृषी सहाय्यक अरविंद काळे, सातारा येथील कृषी तांत्रिक अधिकारी अमर निंबाशळकर, कृषी पर्यवेक्षक मल्हारी नाळे, सत्यम जिरेनियम कंपनीचे संस्थापक श्रीरंग शिंगाडे, भिमराव गावडे, कमलाकर भोईटे आदींची उपस्थिती होती.
जिरेनियम याविषयी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना अरविंद काळे म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा, पारंपरिक पिकांच्या उत्पादनातील आणि भावातील अनिश्चितता यातून मार्ग काढण्यासाठी प्रयोगशील शेतकरी नवनव्या पिकांच्या शोधात असतात. आता या प्रयोगातूनच पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात जिरेनियमच्या लागवडीकडे अनेक शेतकरी वळले आहेत.
अत्तरे, सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनासाठी जिरेनियमच्या तेलाला मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधन उद्योगाच्या गरजेपैकी अवघे पाच टक्के जिरेनियम तेलाचे उत्पादन देशात होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग प्रामुख्याने आयात तेलावर अवलंबून आहे. केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (लखनौ) यांच्या अहवालानुसार देशांतर्गत सौंदर्य प्रसाधन उद्योगाची सुगंधी तेलाची गरज सुमारे 250 टनांची आहे. त्यापैकी अवघे दहा टन तेलाचे उत्पादन देशात होते. त्यामुळे भविष्यात जिरेनियम तेलाची मागणी वाढती राहणार आहे, अशी माहिती अमर निंबाळकर यांनी दिली.
मल्हारी नाळे यांनी सुगंधित तेल उत्पादक पिकांची माहिती आणि बाजार भाव याविषयी माहिती दिली. तालुक्यातील हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये कमी पाण्यात योग्य व्यवस्थापनामध्ये या पिकाचे उत्पादन घेतल्यास ऊस शेतीला एक उत्तम पर्याय होईल, असे नाळे यावेळी म्हणाले.
जिरेनियम हे कमीत कमी जोखमीचे पीक आहे. जनावरे विशेषत: हरीण, रानडुक्कर, शेळ्या, मेंढया, मोर या पिकाकडे फिरकत नाहीत. नैसर्गिक आपत्तीत जिरेनियमचे फारसे नुकसान होत नाही. शाश्वत भाव मिळतो. काळजीपूर्वक उत्पन्न घेतल्यास जिरेनियमपासून चांगला फायदा होतो. सत्यम जिरेनियम तेल कंपनी शेतकर्यांना करार करून योग्य हमीभाव देणार असल्याचे, श्रीरंग शिंगाडे यांनी सांगितले.
जिरेनियम शेतीसाठी येणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पन्न याचे फायद्याचे गणित फलटण येथील प्रयोगशील शेतकरी व कंपनीचे संस्थापक भिमराव गावडे यांनी शेतकर्यांना स्वतःच्या अनुभवातून सांगितले.