दैनिक स्थैर्य | दि. ७ जुलै २०२३ | फलटण |
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ पर्यंत ३ वर्षांसाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती फलटण तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी दिली.
राज्य शासनाने सन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना केवळ १ रूपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांचेमार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रू. ४०/- देण्यात येते; परंतु राज्यातील काही सामूहिक सेवा केंद्र धारकांकडून शेतकर्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
त्याअनुषंगाने सर्व शेतकर्यांनी सामूहिक सेवा केंद्र धारकांकडून केवळ १/- रूपया भरून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी व सामूहिक सेवा केंद्र धारकाने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार/तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी केले आहे.