दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील टंचाई घोषित केलेल्या गावांच्या सरपंच, उपसरपंच, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, लाईनमन यांची बैठक प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत प्रांताधिकार्यांनी विविध विभागांना आगामी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाणीप्रश्न व जनावरांच्या चार्याच्या नियोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या.
प्रांताधिकार्यांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे :
- गावोगावी ग्रामस्तरीय समिती स्थापन कराव्यात. ज्यामध्ये सरपंच, उपसरपंच, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहाय्याक, पोलीस पाटील यांचा समावेश असावा.
- पाणी टँकरचे रेकॉर्ड व्यवस्थित असावे. प्रत्येक टँकरमधून प्राप्त होणारे पाणी योग्य पद्धतीने वाटप करावे.
- शेतकर्यांनी चारा पिकांची लागवड करावी, जास्त पाण्याची पिके टाळावीत. वैरण विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना यातून वैरण उत्पादन वाढवावे.
- एनआरबीसीच्या पुढील अवर्तनात जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या ८३ विहिरींचे पाण्याच्या अनुषंगाने नियोजनाचा ‘प्रॉपर प्लॅन’ तयार करण्याचे निर्देशही विभागाला देण्यात आले.
यावेळी बीडीओ, एमएसईबीचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी हजर होते. उद्या दुपारी ४ वाजता तालुकास्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे.