स्वयंचलित हवामान केंद्रांच्या मदतीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन व्हावे : आमदार दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२५: खरीप किंवा रब्बी हा विषय आता गौण असल्याने हवामान, पाण्याची स्थिती विचारात घेऊन शेतकरी पिके घेत असल्याने कृषी खात्याने त्यादृष्टीने विचार करुन शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार बियाणे, पुरेशी खते मागणीनुसार बांधावर उपलब्ध करुन द्यावीत, तालुक्यात आता स्वयंचलीत हवामान केंद्र प्रत्येक महसूल मंडल ठिकाणी कार्यान्वित झाली असल्याने त्याआधारे शेतकर्‍यांना बदलते हवामान, पाऊस या विषयी माहिती देऊन मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी व्यक्त केली.

राज्य शासन कृषी खात्याच्यावतीने दि. 21 जून ते 1 जुलै दरम्यान कृषी संजीवनी योजनेंतर्गत आगामी खरीप हंगामाचे पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना विविध कृषी योजनांविषयी माहिती देवून मार्गदर्शन करण्यात येणार असून सदर योजनेचा शुभारंभ रावडी बु॥, ता. फलटण येथे आ. दिपकराव चव्हाण, युवानेते श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती भगवानराव होळकर, आत्मा संचालक विनायक राऊत, उप विभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, सरपंच जगन्नाथ सुळ, उप सरपंच अनिल बोबडे, रामभाऊ कदम, बापूराव कर्वे, सतीश साडगे, सुरेश काकडे यांच्यासह रावडी व पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ कृषी अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

श्रीमंत सत्यजीतराजे म्हणाले, बीज प्रक्रिया, पेरणी प्रात्यक्षिक, बांधावर खतांची उपलब्धता आदी बाबीतून कृषी खात्याने खरीप हंगाम पूर्व तयारीला सुरुवात केल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानावर आधारीत औजारांचा वापर कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार करावा. फलटण तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये परतीच्या मान्सूनचा पाऊस होत असल्याने फलटण रब्बीचा तालुका समजण्यात येत असला तरी अलीकडे गेल्या काही वर्षात निसर्ग चक्र पूर्णतः बदलून गेल्याने ऋतू चक्रही बदलले आहे परिणामी खरीप व रब्बी हंगामही बदलल्याचे नमूद करीत बदलत्या परिस्थितीत शेतकरी वर्ग पाण्याची उपलब्धता पाहुन पिके करीत असल्याचे श्रीमंत सत्त्यजितराजे यांनी स्पष्ट केले.

शेतीतून अधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या शेतात केलेल्या सर्व पिकांचे एकरी उत्पादन वाढीला प्राधान्य देवून शेती केल्याशिवाय शेती फायदेशीर होणार नाही, त्यासाठी कृषी अधिकार्‍यांनी कोणत्याही हंगामात किंवा बिगर हंगामात पिके घेताना एकरी खर्च कमी कसा होईल आणि तरीही एकरी अधिक उत्पादन कसे घेता येईल याविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा श्रीमंत सत्त्यजितराजे यांनी व्यक्त केली.

म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करण्यात आली असून काही फळांवर असलेली रोगराई सोडता बहुतांश शेतकर्‍यांना फळबागातून चांगले उत्पादन होत असले तरी मागणी नसल्याने या फळांतून फारसा समाधानकारक आर्थिक लाभ होत नसल्याने फळ प्रक्रिया उद्योगांची उभारणी केल्यास शेतकर्‍यांना समाधानकारक पैसा आणि बेरोजगार तरुणांना उद्योजक किंवा औद्योगिक क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करण्याची संधी निश्‍चित मिळेल, असा विश्‍वास सत्यजितराजे यांनी व्यक्त केला.

शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी जमीन आरोग्य प्रत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापर, बीजप्रक्रिया, रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल अभियान यावर शेतकर्‍यांनी भर देणे गरजेचे असल्याचे कृषी उपसंचालक आत्मा, सातारा विजयकुमार राऊत यांनी केले.

राऊत पुढे म्हणाले, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कृषी संजीवनी मोहीम दि. 21 जून ते दि.1 जुलै या कालावधीत राबविण्यात येत असून याद्वारे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, कृषी विभाग जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ, कृषी मित्र वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत असतात. कृषी विभागाच्या या उपक्रमांचा, नियोजनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात बीबीएफ मशीनद्वारे पेरणी प्रात्यक्षिक प्रसंगी श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतकर्‍यांना त्याविषयी मार्गदर्शन केले, तर फळबाग योजनेसाठी म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उपयुक्त असल्याचे त्यासंबंधीच्या पत्रकाद्वारे शेतकर्‍यांना समजावून देत लाभ घेण्याचे आवाहन केले.


Back to top button
Don`t copy text!