दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । लोणंद । शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण बेंदूर सण साजरा होत आहे. शेतात शेतकऱ्यासोबत राबणाऱ्या सर्जाराजासाठी सजावटीचे साहित्य, पूजा अर्चा व नारळ घेण्यासाठी सोमवारी लोणंद शहरामधील मध्यवर्ती बाजारपेठ गजबजून गेली होती. ग्रामीण भागात बैंदुर सणाचा उत्साह चांगला दिसत आहे.
बेंदूर सण साजरा करण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. यंदा पावसाने बराच काळ ओढ दिली होती पण आता सतत धार पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी झूल, रंगीबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी सोमवारी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली होती. सोमवारी दिवसभर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसून आले. शेतकऱ्यांसोबत शेतीत राबणाऱ्या त्याच्या सुख-दु:खात सोबत राहणाऱ्या ढवळ्यापवळ्याचा सण म्हणजे बेंदूर शेतीत सोने उगविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर सण शेतकरी थाटात साजरा करीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करीत सजावट साहित्य खरेदी केली
सातारा जिल्ह्यात यंदा बेंदूर सण साजरा करण्यासाठी शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलांना सजविण्यासाठी शहरातील बाजार पेठेत सजावटीच्या साहित्याची दुकाने आहेत. लोणंद शहराच्या पंचक्रोशीतील शेतकरीवर्ग खरेदीसाठी सकाळपासून बाजारपेठेत आला होता. शिंगाना लावण्यासाठी आकर्षक रंग, गळ्यात घंटाच्या माळा, गोंडे, झूल असे साहित्य खरेदी केली जात होती.
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यात नारळ, मातीचे आकर्षक बैल, पुजेसाठीचे बैल, पुजेचे साहित्य अशा वस्तूंचा समावेश होता. सोमवारी सायंकाळी बेंदूर सणासाठी शहरातील नागरिकांनी पुजेसाठी मातीचे बैल व इतर साहित्य घेण्यासाठी गर्दी
केली होती
आधुनिक युगात प्रगत तंत्रज्ञानामुळे बैलांची जागा ट्रॅक्टरने घेततील आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी कमी होत आहे. त्यामुळे बेंदूर सणाला बैल पूजा करण्यासाठी मातीच्या बैलांना महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मातीच्या बैलांची मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते. लोणंदकुंभारवाडा येथे आज लहान बैल जोडी 50 रुपयांना, तर मध्यम बैलजोडी शंभर ते दोनशे रुपये पर्यंत आणि मोठी बैल जोडी ३00 ते 800 रुपयांपर्यंत विकली जात होती