स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२७: नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ देशभरातील शेतकरी 32 दिवसांपासून दिल्ली सीमेवर ठाण मांडून आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी थाळी वाजवून निषेध केला. भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ज्याप्रकारे पंतप्रधानांनी म्हटले होते की, थाळी वाजवल्याने कोरोना पळून जाईल, त्याचप्रमाणे शेतकरी देखील थाळ्या वाजवत आहेत, जेणेकरून कृषी कायदे रद्द करता येतील.
राकेश टिकैत म्हणाले की, सरकारने लवकर सुधारावे यासाठी हा संकेत आहे. 29 डिसेंबर रोजी आम्ही सरकारसोबत चर्चा करणार आहोत. येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी शुभ असावे आणि जर मोदीजींनी कायदे रद्द केले तर नवीन वर्ष आम्हा शेतकऱ्यांसाठी देखील शुभ होईल.
दुसरीकडे क्रांतिकारी शेतकरी युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले की, पंजाब आणि हरियाणातील टोल खुली राहतील. 30 डिसेंबर रोजी सिंघु बॉर्डरवरून ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत. आम्ही दिल्लीसह संपूर्ण देशातील लोकांना आवाहन करीत आहोत की आपण येथे येऊन नवीन वर्ष आमच्याबरोबर साजरे करा.