दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजारांचा लाभ देण्याचे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील 84 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत दि. २९ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय झाला होता. याच्या अंमलबजावणीबाबत सहकार व पणन विभागाची बैठक मुख्य सचिव अनूप कुमार यांच्या उपस्थितीत झाली. यामध्ये कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.
यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी दि. 12 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. 13 ते 18 दरम्यान पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करायचे आहे. यानंतर दि. १८ रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहेत. दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. तसेच याबाबत आवश्यक त्या सूचना दि. 14 रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधणार आहेत.