
दैनिक स्थैर्य । दि. २० नोव्हेंबर २०२२ । सातारा । पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हायवे बाधित सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष भाई एडवोकेट समीर देसाई आणि पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकरी संघर्ष समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश शिंदे यांनी दिली. -. पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हायवे हा महाराष्ट्रातील पुणे , सातारा , सांगली या जिल्ह्यातून जाणार असल्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण , कोरेगाव , खटाव या चार तालुक्यातील साठ गावांमधून तो जाणार असल्याचे समजते. त्यासाठीचे मार्किंग दगड लावण्यात आलेले आहेत. म्हणून या बाधित शेतकऱ्यांच्या वतीने सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी ( दि.२१) सकाळी ११ वाजता मोर्चा आयोजित केल्याची माहिती सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश शिंदे यांनी दिली. सातारा येथील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. मोर्चाचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे राज्य संघटक व पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड हायवे बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे हे करणार आहेत. पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला खाजगी वाटाघाटीने एकरी दोन कोटी किंवा चालू बाजारभावाच्या दहापट मोबदला मिळावा , बाधित क्षेत्रातील बांधकामे , विहिरी ,बोअरवेल ,पाईपलाईन , फळझाडे , फळबागा यांचे चालू बाजारभावाप्रमाणे योग्य मूल्यांकन करून त्याच्या चारपट मोबदला मिळावा , प्रत्येक गावातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत ग्रीनफिल्ड हायवेचे कसलेही काम कुठल्याही बाधित गावच्या हद्दीत सुरू करू नये , महामार्ग बाधित शेतकऱ्यांना वहिवाटीप्रमाणे निवाडा नोटीस द्यावी वहिवाट ठरवण्यासाठी शासकीय कमिटी नेमावी , शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मोजणी करण्यापूर्वी चार दिवस अगोदर बाधित शेतकऱ्यांना लिखित स्वरूपात निरोप द्यावा आदी मागण्या या बाधित शेतकऱ्यांच्या आहेत असे संघर्ष समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश शिंदे व शेतकरी कामगार पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष एडवोकेट समीर देसाई यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न करता दडपशाहीने महामार्गाची कसलेही काम सुरू केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे. या मोर्चात बाधित शेतकऱ्यांनी व याला पाठिंबा देणाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन एडवोकेट समीर देसाई व रमेश शिंदे यांनी केले आहे.