दैनिक स्थैर्य । दि. 29 नोव्हेंबर 2021 । फलटण । फलटण तालुक्यामधील शेतकऱ्यांना विविध अडचणींना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. आगामी काळामध्ये मिळालेल्या पदाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी वर्गाला केंद्रस्थानी मानून कार्यरत राहणार आहे, असे मत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “जय – व्हिला” या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्रीमंत विश्वजितराजे बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये कोणत्या प्रकारे कामकाज सुरु राहणार आहे. याबाबत सुद्धा परखड मते श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
सुमारे पाच वर्षांपूर्वी फलटण पंचायत समितीच्या वाठार निंबाळकर गणामधून निवडून आल्यानंतर फलटण तालुक्यातील विविध घटकांचा अभ्यास सुरु करण्याचे काम केले. काही वर्षांपूर्वी सुद्धा तालुक्यातील कार्यकर्ते मला सभापती पद मिळावे यासाठी आग्रही होते. परंतु त्यावेळी माझा अभ्यास पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे मी त्या वेळी सभापती पद स्वीकारले नाही. पंचायत समितीच्या सभापती पदी काम करण्याची संधी दिल्याने आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील विविध विभागांमधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी बांधील आहे, असेही श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
रामराजेंच्या नेत्तृत्वात १९९१ पासून फलटण तालुक्याचा अविरत विकास
फलटण तालुक्यामध्ये विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेत्तृत्वाच्या माध्यमातून सन १९९१ पासून विकासगंगा सुरु झाली असून आगामी काळामध्ये सुद्धा हीच विकासगंगा ताकदीने सुरु ठेवणार आहे. सन १९९१ पासून फलटण तालुक्याचा अविरत विकास सुरु आहे. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विकासामध्ये कोठेही कमी पडणार नाही याची ग्वाही सुद्धा श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम करणार
शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना ह्या केंद्र व राज्य शाशनाच्या आहेत. त्या योजना सर्व सामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत पोहचवण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये सुरु करणार आहे. फलटण पंचायत समिती हि शेतकऱ्यांच्या साठी हक्काचे व्यासपीठ म्हणून कार्यरत राहणार आहे. फलटण तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांध्यावर जावून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुद्धा आगामी काळामध्ये आम्ही करणार आहोत, असेही श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
संपूर्ण तालुक्याचा दौरा करणार
फलटण तालुका हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोठा असा तालुका आहे. फलटण तालुक्यामधील सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येवून काम करण्यासाठी वेळ व पैसा दोन्हीही खर्च होत असतात. तरी आगामी काळामध्ये पंचायत समिती गण निहाय कामकाज करता येईल का ? याबाबत सविस्तर माहिती घेवून पुढील दिशा ठरवणार आहे. त्यासाठी व फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न माहिती करून घेण्यासाठी तालुका दौऱ्याचे आयोजन हे आगामी काही दिवसामध्ये करणार असल्याचेही यावेळी श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले.
शेतकऱ्यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकाऱ्यांनी त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे
फलटण तालुक्यामध्ये विविध कामांसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागामधून शेतकरी व नागरिक हे येत असतात. त्यांना फलटणमध्ये आल्यावर बहुतांश अधिकारी हे कागदी घोडी नाचवत खेळवत ठेवत असतात. आगामी काळामध्ये असले जर प्रकार अधिकाऱ्यांनी केले तर त्या सर्व अधिकाऱ्यांची गाठ हि माझ्याशी आहे, असेही श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंचायत समितीचा नावलौकिक राज्यभर करणार
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या प्रमाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून कार्यरत आहे. त्याच प्रमाणे फलटण पंचायत समिती हि शेतकरी वर्ग व त्यांचे पुढील पिढी यांना केंद्रस्थानी ठेवूनच कार्यरत आहे. फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून फलटण पंचायत समितीचा नावलौकिक राज्यभर करणार असल्याची ग्वाही सुद्धा श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
तालुक्यातील युवकांना तालुक्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी भर देणार
फलटण तालुक्यामधील युवकांना स्पोकन इंग्लिश सारखे विविध प्रशिक्षण देणार आहे. फलटण तालुक्यातील युवकांना फलटण तालुक्यामध्येच रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. फलटण तालुक्यातील युवकांना फलटण तालुक्यामध्येच रोजगार दिल्यानंतर मुले घरी राहूनच संपूर्ण संसार चालवण्यासाठी सक्षम बनवणार आहोत, असेही श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.