दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२३ । सातारा । फलटण तालुक्यात विविध फळ पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वाव असल्याने शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन अभियान तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळपिकांच्या लागवडीवर भर देऊन विविध पिकांचे मुल्यवर्धन, फळ प्रक्रिया उद्योगाकडे वळाल्यास आर्थिक उन्नती साधता येईल, असे फलटणचे तालुका कृषि अधिकारी सागर डांगे यांनी सांगीतले.
फलटणचे उपविभागीय कृषि अधिकारी कैलास धुमाळ आणि श्री. डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग आणि ग्रामपंचायत शेरेचीवाडी ता.फलटण यांच्यावतीने 25 जून ते 1 जुलै दरम्यान कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी फलटण श्री डांगे बोलत होते.
श्री. डांगे म्हणाले, विविध पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीच्या उत्पादकतेवर भर देणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताच्या मृद चाचणी वर आधारित खत नियोजन करून ठिबक सिंचन, पेरणी पूर्वी बिजप्रक्रिया तंत्रासह आधुनिक लागवड पद्धती, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास कमी पाण्यावर व कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे सहज शक्य होईल.
यावेळी सतीश निंबाळकर मंडळ कृषि अधिकारी, यांनी कृषी विभागाच्या विविध योजना संबंधी सविस्तर माहिती देताना स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना तसेच हुमणी किडीसाठी प्रकाश सापळे उभारणी आणि कामगंध सापळ्यांचा वापर या विषयावर सविस्तर विवेचण केले. याकार्यक्रमामध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतानाच सहाय्यक कृषि अधिकारी योगेश भोंगळे यांनी खरीप हंगाम नियोजन व ऊस उत्पादन वाढीसाठी सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञाना बाबत माहिती दिली. यावेळी शेरेचीवाडी परिसरातील प्रगतीशील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.