दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२४ | फलटण |
केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांसाठी पी. एम. किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ अद्यापही फलटण तालुक्यातील काही शेतकर्यांना मिळत नाही. या योजनेचा लाभ तालुक्यातील शेतकर्यांना वेळेवर मिळत नाही, त्या शेतकर्यांना तो नियमित मिळावा तसेच जे शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पत्र लिहिले आहे.
पत्रात श्रीमंत रामराजेंनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून फलटण तालुक्यातील शेतकर्यांचे पी. एम. किसान सन्मान निधीच्या पात्र लाभार्थ्यांना वेळेत हप्ते मिळत नाहीत. तसेच कित्येक शेतकर्यांचे हप्ते बंद झाले आहेत. जवळजवळ फलटण तालुक्यातील ३६५० लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.
या शेतकर्यांना पुढील अडचणी येत आहेत.
१) रेकॉर्ड नॉट फाऊंड होणे, आधार नंबर चुकीचे असल्यामुळे आधारकार्ड अपडेट करता येत नाही.
२) मोबाईल नंबर दुरुस्ती करता येत नाही.
३) लॅण्ड सिंडींग लवकर होत नाही.
४) गाव बदल, तालुका बदल तहसील व कृषी लॉगिंगला होत नाही.
५) बरेच अर्ज अनअॅक्टीव केले आहेत. चालू हप्ते बंद पडले आहेत.
६) डुप्लीकेट अर्ज नोंदणी रद्द होत नाही.
७) सर्वाच महत्त्वाचे तालुका पातळीवर लॉगिंगमध्ये बदल होत नाही.
या बाबींचा विचार करून कृषी आणि महसूल ऑफिसमध्ये सर्व साधारण शेतकर्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर आचारसंहितेपूर्वी योग्य प्रशिक्षित मनुष्यबळ आणि तालुका पातळीवर लॉगिंगमधील बदलाचे अधिकार आपल्या वरिष्ठ पातळीवरून प्रदान करावेत, अशी आमची मागणी आहे, असे श्रीमंत रामराजेंनी पत्रात म्हटले आहे.