स्थैर्य, वाई, दि. १६: वाई बाजार समितीवर शेतकऱयांचा हळदीच्या लिलावासाठी मोर्चा काढण्यात आला.तालुक्यात हळदीचे पिक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. हदळीच्या लिलावात २९ हजार क्विंटल रुपये दर दिला मिळाला होता. त्यामुळे बाजारसमितीत हळदीची मोठया प्रमाणावर आवक झाली.त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले. लिलावाची प्रक्रिया बंद असल्याने आज शेतकऱ्यांनी वाई बाजार समितीवर मोर्चा काढला. सभापतीं लक्ष्मणराव पिसाळ यांनी या शेतकऱ्यांना लवकरच लिलाव घेवू असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन तुर्तास स्थगित झाले.
यामुळे बाजार समितीच्या आवारात सर्व व्यापाऱ्यांकडे आडत दुकानांवर दहा हजार पोत्यांची आवक झाली आहे. मात्र, मागील एक महिन्यापासून लिलाव बंद आहेत. आज आठवडी बाजार सोमवारमुळे लिलाव होतील या अपेक्षेने मोठया संख्येने शेतकरी बाजार समितीत जमा झाले होते. बराच वेळ थांबल्यानंतरही लिलाव निघत नाहीत, असे दिसून आल्यावर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला व बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बाजार समितीचे कर्मचारी व सदस्य व सभापती उपस्थित होते. शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांच्याकडे लिलाव काढण्याची मागणी केली. दहा हजारांच्या पुढे बोली काढावी अशी मागणी केली. लवकरात लवकर हळदीचे पैसे मिळावे, अशी मागणी केली. यावेळी सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेवून ताबडतोब लिलाव घेवू असे आश्वासन दिले.