दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । कोरेगाव। राजकीय द्वेषापोटी ईडीने चिमणगावचा जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला असून, केंद्र शासनाचा हा निर्णय शेतकर्यांवर अन्याय करणार असून, कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालूच ठेवा, अशा मागणीसाठी शुक्रवारी कोरेगावात सर्वपक्षीय कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकर्यांच्यावतीने तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने मोर्चा काढण्याचा निर्णय सकाळीच रद्द करण्यात आला.
जरंडेश्वर कारखान्यावर दि. १ जुलै रोजी अंमलबजावणी संचानलनालयाने जप्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर साखर कारखानदारी क्षेत्रात खळबळ उडाली. कारखाना बंद राहणार या भीतीने शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांनी केंद्र शासनाकडे कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालूच ठेवा, अशी आग्रही मागणी केली आहे.
सोमवार दि. ५ जुलै रोजी वडूज येथे खटाव व माण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर कोरेगावात शुक्रवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, कामगार, ऊस तोडणी मजूर, ठेकेदार, वाहतूक व्यवस्थेचे ठेकेदार आदींनी मोठ्यासंख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांसह महसूल प्रशासनाने पूर्णत: खबदारी घेत बंदोबस्त वाढविला होता.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने मोर्चा काढण्याचा निर्णय सकाळीच रद्द करण्यात आला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय कार्यालय शेतकर्यांचे केंद्रबिंदू ठरु लागले. पोलिसांनी मॉडर्न हायस्कूल कॉर्नरपासून शहरात येणारी वाहतूक वळविल्याने कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी चालत बँकेपर्यंत पोहचत होते. बँक आवाराला गर्दीचे स्वरुप आले होते.
पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, किरण बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांची भेट घेऊन गर्दी न करण्याचे आवाहन केले. मोर्चा स्थगित झाल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांनी आणि शेतकर्यांनी निवेदन द्यावे, अशी पोलिसांनी विनंती केली. त्यानुसार शशिकांत पिसाळ, राजेंद्र भोसले, प्रतिभाताई बर्गे, मनोहर बर्गे, विलासराव बर्गे, युवराज कदम, संजय साळुंखे, विकास साळुंखे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर केले. कारखाना बंद करण्याची कृती जर केंद्र शासनाने केली तर रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला आहे.
कोरेगावला पोलीस छावणीचे स्वरुप
जरंडेश्वर साखर कारखाना आणि पोलीस बंदोबस्त असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलाला अनुभवायास मिळत आहे. सर्वपक्षीय मोर्चा आणि शेतकर्यांची आक्रमकता पाहून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. उपअधीक्षक, निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांसह कर्मचारी शहरात ठिकठिकाणी तैनात होते. अनेक मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. मार्केट कमिटी परिसरात देखील पोलीस तळ ठोकून होते. एकूणच शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, वेळप्रसंगी अचानक निर्णय घ्यायचा झाल्यास कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने नायब तहसीलदार देखील पोलिसांबरोबर रस्त्यावर उतरले होते.